“ती सध्या काय करते.?” हा प्रश्न सहजच मनात उपस्थित राहिला. गोरेपान रंग प्राप्त झालेली ती, सहज सुंदर दिसत असेल कधीतरी. कधी काळी लांबसडक काळे केस असतील तिचे.! अतिशय लाडा कोडात वाढलेली गावातील पाटलाची पोर ती. शेकडो एकर जमिनीचे मालक तिचे जन्मदाते. आणि वारश्याने तिच्या वाट्याला आलेली ती जमीन आणि तो मोठा वाडा. एकदम कडक स्वभावाची ती, बऱ्याचदा कठोर बोलणारी..आणि तरीही सर्वांना आपल्याभोवती गोळा करून ठेवण्याची सिद्धी तिला होती. मला सुरुवातीला याच भारी आश्चर्य वाटायचं पण जसं जसं माझी समज वाढली तसं त्यामागचं कारण सुद्धा मला कळलं आणि त्याच बरोबर वाईट पण वाटलं!
कधी कधी जी माहिती मिळायची त्यावरून मला रागही यायचा तिच्या वागणुकीचा पण प्रेम कमी होत नव्हतं. पण एक दिवस हाच प्रश्न मनात डोकावला "ती सध्या काय करते.?" आणि दुर्दैव म्हणजे त्याच्याच दुसऱ्या दिवशी दुपारी बहिणीचा मेसेज आला "ती गेली."
कधी नव्हे ते नेमक्या त्याच रविवारी मी नोकरीशी निगडित कामाने "ऑन ड्युटी" बाहेर होतो. मनात प्रचंड चलबिचल सुरु झाली, "काय करावे?" काही समजत नव्हते. गेल्या दोन-तीन वर्षात तिच्या भेटीलासुद्धा गेलो नव्हतो मी. बऱ्याचदा मनात आलं होतं की एकदा भेटून यावं तिला, पण काही ना काही कारणाने राहिलंच भेटणं; आणि आता अशी दुर्दैवी बातमी. तसं बातमी अनपेक्षित नव्हती. तिची तब्बेत तशीच झालेली होती, त्यामुळे आज ना उद्या काही काळाने ती जाणारंच हे सर्वांनी गृहीत धरलेच होतं, पण अशी शेवटची भेट न होता ती कायमची निघून जाईल हे ध्यानी मनी नव्हतेच मुळी माझ्या.
मी ड्युटी वर असल्यामुळे मित्राला कॉल करून ताबडतोब ट्रेनच्या तिकिटाच्या उप्लब्धतेबद्दल विचारलं. त्वरित वरिष्ठांना बोलून निघायला हवं आणि मिळेल त्या ट्रेन ने तिच्या अंत्यविधीला तरी जावं याच विचारात असतांना परत बहिणीचा मेसेज आला की "चुकीची बातमी आली होती". थोडं चेहऱ्यावर हास्य आले. मी परत आपल्या कामाच्या धावपळीत मग्न झालो.
पण ज्याप्रमाणे फुलपाखरांचे आयुष्य क्षणभंगुर असते तसंच माझ्या या आनंदाचं झालं. एका तासाने परत बहिणीने कॉल केला, म्हटलं,"ती गेली!"
अश्यावेळी बातमी आली की मी निघू शकत नव्हतो, आणि निघालो असतो तरी तिचं अंतिम दर्शन मात्र झालं नसतं कारण तिच्यावर हक्क सांगणाऱ्यांनी अंतिम संस्कार दुसऱ्या दिवशी सकाळीच आटोपायचं ठरवलं होतं.
मनातल्या मनात तिला नमस्कार केला; परमपिता परमेश्वराला हात जोडून विनंती केली की तिला मोक्ष लाभू दे.
आठवडा भरानंतर:-
"ती गेली, पण आता पुढे काय? पुढल्या विधींच काय.? दशक्रिया विधी, तेरावं कधी कुठं करणार आहेत?" मी हे जाणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर मला धक्काच बसला. तिच्या जिवंतपणी जो प्रकार तिने बघितला, तो प्रकार तिच्या मृत्यूनंतर तरी सम्पेल ही आमची आशा फोल ठरली.
तिच्या जिवंतपणी तिच्या संपत्तीसाठी आपापसात भांडणारी तिची मुलं आज ती मेल्यानंतरही एक झालेली नव्हती. ज्या मुलांना तिने आपल्या वडिलोपार्जित संपत्तीचा भाग मुक्तहस्ते वाटला होता त्यांनी फक्त जमिनीच्या तुकडा आपल्या नावे करून घ्यायसाठी तिला एकमेकांकडे फिरवलं होतं. आणि खेद म्हणजे आजही तिच्या मृत्यूनंतर तिला एकमेकांकडे वाटून घेत होते.
भावंडांनी दोन वेगवेगळे अस्थिविसर्जन वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री करायचं ठरवलं. दोन वेगवेगळ्या दशक्रिया विधी; वेगवेगळ्या ठिकाणी तेराव्याचं जेवण ठरवण्यात आलं. का.? मायेवर कोणाचं प्रेम जास्त आहे ते दाखवण्यासाठी की स्वतःचा अहंकार जपण्यासाठी. तिच्या मनावर, गुणांवर, संस्कारांवर कोणी हक्क सांगितला नाही मात्र संपत्तीवर सांगितला.
शेवटी माझ्यासारख्या तिच्या हतबल नातवांना हाच प्रश्न पडतो, "ती सध्या काय करते.?"
आणि उत्तर हेच की" ती सध्या भावंडांच्या यादवीत दोन दोन अस्थिकलशांत राहते! जीवनाचं अंतिम सत्य प्रकट रुपाने मांडते" ते सत्य जे गझलसम्राट सुरेश भटांनी स्वतःच्या शब्दांत मांडलंय
"इतुकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरण्याने केली सुटका, जगण्याने छळले होते.!"