बऱ्याच दिवसांनी आज तिथे येउन बसलो, जिथे आपण दोघे रात्रीच्या एकांतात येउन बसायचो. मस्त नेहमीप्रामाणे एकांत आहे..!
सोबत पौर्णिमेची रात्र आहे पण दाटलेल्या श्यामवर्णी मेघांनी त्या श्वेतवर्णी सोमराजाला पार झाकोळून टाकले आहे.
नेहमीप्रमाणे मी तिथल्या बाकडयावर लेटून आभाळ न्याहाळतो आहे, पण काळवंडलेला तो आसमंत माझ्याकड़े विकट हास्य लेवुन बघतो आहे. जणू तो मला आठवन करून देतो आहे की माझ्याप्रमाणे तुझ्या मनाचे आसमंत सुध्दा आता विरह दुःखानी काळवंडलेले आहे.
मला आवडतो तशी मंद वाऱ्याची ठण्ड झुळूक येत आहे, पण या झुळूकेत मला तुझ्या केसांच्या गंधाची कमतरता जाणवते. तो तो अवखळ समीर तुझ्या केसांना जेव्हा झुलवायचा तेव्हा चेहऱ्यावरील बटांना बाजुला करण्याची तुझी ती धडपड, आणि त्यावेळी तुझे ते निरागस रूप बघून वाढणारी माझ्या काळजातील धडधड.
आज तो वारा मला खिजवतो आहे की "आज माझ्या संगे मी तुझ्या प्रीतिचा गंध नाही आणला आहे तर फ़क्त तिच्या आठवणींचा बंध आणला आहे. शोध तो प्रीतगंध. आठव कधी माझ्या खोड्यांमुळे तुझ्या प्रेमात वाढ व्हायची आणि आज माझ्या वाहण्यानी तुला स्मृतीदंश होतो आहे."
मला जेव्हा कधी एकांत हवा असायचा तेव्हा मी इथे यायचो. मला कधी कोणाचा खुप राग यायचा तेव्हा मी इथे यायचो राग व्यक्त करायसाठी. कधी खुप आनंद झाला तर इथेच यायचो आनंद व्यक्त करायसाठी. इथे येउन मस्त जोरात ओरडायचो. ज्याचा राग असेल त्याला खुप शिव्या घालायचो एकांतात आणि आनंदात खुप जोरात गाणे म्हणायचो. मला जेव्हा कधी खुप विचार करायचा असेल तेव्हा मी इथे यायचो. या एकांत स्थळी मला नवीन कल्पना सुचायच्या. नि त्यांच्या जोरावर मी सर्वांची वाहवा मिळवायचो.
ही जागा फ़क्त आणि फ़क्त माझीच होती. ना मी इथे कधी कोणाला सोबत आणायचो ना कोणाला सांगायचो. हां एकांत मला हवाहवासा वाटायचा. सर्वांच्या कचाट्यातुन बाहेर निघण्यासाठी मी इथे यायचो, आपले मोकळेपण अनुभवण्यासाठी इथे यायचो.
पण एक दिवस सर्व उलटे झाले.
तुला माझ्यावर प्रेम झाले, नि मला पण. मग तुझ्याप्रेमाखातर, तुझ्या हट्टाखातर मी तुला इथे घेउन आलो. तुला तो एकांत ती जागा जाम आवडली. मग वरचेवर आपण इथे येऊ लागलोत. किती तरी रात्रि आपण अशा एकमेकांना समजुन घेण्यात नि उलगडन्यात घालवल्या. मग तर ती जागा आणि तू अशी सवयच झाली मला. तुझ्याविना त्या जागेची कल्पनासुध्दा करवत नव्हती मला. इथेच आपण एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली. आणि तूच मला इथे एकटे सोडून निघून गेलीस. आज तुझ्याविना ही जागा पोरकी वाटते. कधी काळी हवाहवासा वाटणारा हां एकांत मला आता खायला वाटते.
काय गम्मत आहे बघ, स्वताला मोकळे करण्याचा उपाय असणारी ही जागा आज मला तुझ्या आठवनिंच्या पाशात अडकवते आहे. आज हां एकांत तुझ्या आठवनींनी भरगच्च झाला आहे. या एकांतात मला तुझ्या प्रीतबंधात बांधल्याची सारखी आठवन होते.
तू मला सोडून निघून गेलीस, तू पुण्यात्मा असल्यानि तुला मोक्ष मिळाला. आज स्वर्गातुन माझी अशी अवस्था बघताना तुला त्रास होत नाही काय ग.? याच ठिकाणी आपली प्रीत फुलली आणि याच ठिकाणी तुझ्या शेवटचा श्वास घ्यावा हां काय दैदुर्वविलास म्हणावा.
शेवटी आता माझ्या जीवात जीव आला बघ, आपण दोघांनी इथे लावलेल्या मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध वारा आपल्या सोबत घेउन आला आणि मी अभिमानानी त्याला बोललो की तुला जिकडे वाहायचे तिकडे खुशाल वाहा, पण तिच्या माणुसकीचा आणि आमच्या प्रीतिचा हां सुगंध मात्र तुला सोबत न्यावेच लागेल. आणि चहुबाजुला जगात प्रेमाच्या कुपितिल सुगंधी अत्तर दरवळेल.