रविवार, 19 नवंबर 2017

दशक्रिया केलेली बरी..!

                           दशक्रिया...! मुळातच पुनर्जन्म, अजर अमर आत्मा, मोक्ष अश्या संकल्पना श्रध्देने मानणाऱ्या हिंदु समाजातील मृत्यूनंतर करायच्या विधींपैकी एक विधी. तो करायचा कि नाही करायचा ? का बरं करायचा? कश्या पद्धतीने करायचा? कोणाच्या हातून करायचा? हे सर्व त्या त्या मृतकाच्या परिवाराचा वैयक्तिक प्रश्न असतो. त्यामुळे आमच्यासारख्या अल्पज्ञानी असणाऱ्या ज्ञानेश्वराने यावर आपल मत न मांडलेलंच बरं. 
                           पण सध्या या विधिच्याच नावावर मराठीत एक चित्रपट आज प्रदर्शित झालाय. बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारित  'दशक्रिया' हा चित्रपट फक्त प्रदर्शित नाही तर अतिशय वादविवादात आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यास कारण म्हणजे ब्राह्मण महासंघाने ह्या चित्रपटावर घेतलेले आक्षेप. ह्या चित्रपटाच्या ट्रेलरमधील दशक्रिया विधी करणाऱ्या पुरोहितांच्या वागणुकीविरोधात एका संवादावरून हा चित्रपट ब्राह्मण विरोधी आहे असा आरोप करत ब्राह्मण महासंघाने हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा निर्धार केलेला होता. 
                           मुळात पौरोहित्य करणे हा सुद्धा इतर व्यवसायांसारखा व्यवसाय आहे असं जर समस्त ब्राह्मण मंडळी मानत असतील. तर मग पुरोहितांना सर्व समाजाने व्यावसायिक समजून त्यांच्याशी वागायला हवं. जसं आपण न्हावी, शिंपी, माळी, सुतार, चांभार, लोहार आदि  व्यावसायिकांशी वागतो.
                          म्हणजे उदाहरणार्थ आपण माळ्याकडे फुलं हार घ्यायला जातो तर आपण त्याला मोबदला देऊन विकत घेतो,  त्याला आपण वाकून नमस्कार करणं किंवा "तुम्ही देवासाठी एवढं चांगलं फुल हार दिलेत म्हणून तुम्ही देव तुल्य आहात", असे मानून त्याला उच्च स्थान देत नाहीत. मात्र एखाद्या पुरोहिताला त्याने पूजा किंवा कोणते कर्मकांड करून दिलीत म्हणजे लागलीच आपला समाज त्याला वाकून नमस्कार करणं किंवा अतिशय उच्च समजल्या जाणारी वागणूक देतो. आणि कालांतराने असले पौरोहित्य करणारे स्वतःला श्रेष्ठ समजायला लागतात किंवा स्वतःची एकाधिकारशाही निर्माण करायला बघतात. ह्यात फक्त त्या पुरोहिताचीच चूक नसते तर त्याला तशी उच्च दर्जाची वागणूक देणाऱ्या समाजाची सुद्धा असते, जो नकळत अश्या वागणुकीतून एका भेदाभेदाला खतपाणी देत असतो. 
                         आणि ब्राह्मणेतर समाजात ह्याच भेदाभेदामुळे विरोध असेल तर त्यात चूक काय..? ह्या अश्या प्रकारच्या भेदाभेदाला उद्देशूनच "दशक्रिया" ह्या चित्रपटातील तो संवाद आहे, ब्राह्मण विरोध म्हणून नाही हे त्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर सहज लक्षात येते. "जसं मनोज जोशींनी साकारलेला किरवंत न्हाव्याला हि जाणीव करून देतो कि आमच्यामुळे तुला कमवायला भेटते." ही स्वतःच्या श्रेष्ठतेची आणि इतरांच्या स्वतःवर अवलंबित्व असण्याची हीन मानसिकतेचे दर्शन आहे. मुळात ब्रह्मज्ञान असलेल्या पुरोहिताला एवढंही भान नसावं कि ज्या ईश्वराच्या नावाने आपण हे सगळी कर्मकांड करून स्वतःची पोटं भरतो तोच ईश्वर हा सगळ्या सृष्टीचा पालनकर्ता आहे. मग स्वतःची एवढी आत्मप्रौढी कशाला मिरवायची.  
                        दशक्रिया विधीवर स्वतःची एकाधिकारशाही निर्माण केलेल्या एका किरवंतावर आणि त्याच्या आत्मप्रौढीवर जर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रहार होत असेल तर काय बिघडलं.?
                       कला, साहित्य, विज्ञान, नाट्य, संगीत, क्रीडा ह्या सर्व क्षेत्रांत इतर अन्य जातीतील लोकांपेक्षा आधी प्रगत होणाऱ्या, नव्या बदलांना सहजतेने सामोरं जाणाऱ्या, नव्या सुधारणांना सहजतेने स्वीकारणाऱ्या ब्राह्मण जातीतील लोकांनी ह्या असल्या एका संवादावरून मराठी भाषेतील एक राष्ट्रीय पुरस्कार विजेता असा चित्रपट बंद पाडायचा प्रयत्न करावा हे मुळातच न पटण्यासारखं.!
                       हिंदूंमधील अठरा पगड ब्राह्मणेतर जातींनी जर स्वतःवरील अन्यायाविरोधात आवाज उठवला ते हिंदुत्वाच्या बळकटीसाठी आवश्यकच आहे की, कारण एका परिवारात काही कमी जास्त झालं तर परिवारातच बोललं जातं. आणि ज्याच्यावर अन्याय होतो त्याची व्यथा ऐकून घेऊन तिचं निराकरण करणं हे त्या परिवाराच्या मजबुती आणि समृद्धीसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे.  तश्या अन्यायाला वाचा फोडणाऱऱ्या कलाकृतीला ब्राह्मण जातीतील लोकांनी विरोध करणे म्हणजे आपण हिंदूंमधील घटक नाहीत असा अन्वयार्थ काढायला वाट करून देणं होय.
                             हरिजन गिरिजनवासी बन के, नगर ग्राम सब साध चलें
उंच नीच का भाव घटा कर, समता के सद्‌भाव बढें
ऊपर दिखते भेद भले हों, जैसे वनमें में फूल खिले
रंग बिरंगी मुस्कानों से, जीवन रस पर एक मिले
संजीवनी रस अमृत पीकर, मृत्युंजय हम हिंदु है……………
संस्कृती सबकी एक चिरंतन खून रगों मे हिंदु हैं
विराट सागर समाज अपना हम सब इसके बिंदू हैं
                      हे गीत आम्ही बालपणापासून ऐकत आलोत . ह्याच्या अर्थानुसार समस्त जातीतील हिंदू हा एक आहे आणि त्याच्या आयुष्यातील दुःख कमी करून त्यास सुसह्य, सुखद आयुष्य जगण्यास मदत होईल अशी व्यवस्था निर्माण करणं हि काळाची गरज आहे. उपासना पद्धतीने हिंदू असणारेच नव्हे तर संपूर्ण विश्वात सुख शांती नांदावी असं हिंदूंच्या ग्रंथांमधील ऋचा, हिंदूंचे संत सांगत आले आहेत. अखिल विश्वाचं कल्याण मागणाऱ्या ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत कबीर, ह्या संतांनी सामान्य जणांच्या दुःखाला आपापल्या काळी वाचा फोडली होती, जातीभेदाच्या पल्याड जाऊन कार्य करणारे हे संत त्यांच्या सुख दुःखाशी समरस झालेले होते. असा तो सर्वसामान्य नर म्हणजेच नारायण आणि त्याच्या सुख दुःखाशी सोयरसुतक जर प्रगत लोकांना नसेल, जर त्याच्यावरील अन्यायाचं परिमार्जन करण्यास आपण तैयार नसू, त्या नररूपी नारायणाची सेवा करण्यास जर आपण तैयार नसू तर मात्र आपण आपल्या आचार विचारांचीच दशक्रिया केलेली बरी..!

रविवार, 6 अगस्त 2017

मित्र म्हणजे हक

         "मित्र म्हणजे...अमुक...मित्र म्हणजे तमुक....." असं कोणी कितीही फिलॉसॉफी झाडली.. तरी मित्र म्हणजे हरामखोर, कमीना (हक) आणि तरीही कायमच हवाहवासा वाटणारा निर्बुद्ध जीव अशीच आपली व्याख्या..
          ह्यांच बोलणं म्हणजे एवढं सोज्ज्वळ की सेन्सॉर बोर्ड ला सुद्धा एवढे बीप बीप टाकावं लागतील की संवादाच्या ऐवजी निव्वळ पिपाणी ऐकू यायची. यांच्या बोलण्याचे विषय आणि त्यांची व्याप्ती एवढी की खोली, उंची, मोजून त्याला कोणत्या ग्रेड मध्ये मान्यता द्यायची याचा विचार करतांना आदरणीय पहलाज काका निहलानी स्वतः पदत्याग करतील.
          काही फक्त वापर करून घेणारे जरी असले तरी स्वतःचा हक्काने वापर करू देणारे बरेच..!
तऱ्हे तऱ्हेचे तऱ्हेवाईक आणि चटपटीत मसालेदार मासलेवाईक अशे विभिन्न प्रकृतीचे हे सर्व.
काही कायमच दुसऱ्यांना गिऱ्हाईक करण्यात धन्यता मानणारे काही नेहमी गिऱ्हाईक होण्यात आनंद मानणारे. रस्त्यावरील अरबट चरबट खाद्यपदार्थ जे कधी प्रकृतीला त्रास देतील अशे काही (मुलींच्या पायातील पादुकांचा आशीर्वाद यांच्यामुळे प्राप्त होण्याची शक्यता जास्तच..)
         काही साक्षात श्रीकृष्णाने अर्जुनास भगवदगीता सांगावी तशे उपदेश देणारे तर काही सिनेमॅटोग्राफर स्टाईल ने उभे करून पोज द्यायला लावणारे. सदा रडत असणारे जशे 'विषाद योगाचं' अनुभव घडवतात तसेच काही सदा न कदा 'हास्ययोग' घडवत असतात (या हास्ययोगात मांसाहारी विनोदायाम जास्त असतात हा भाग अलाहिदा).
           कधी वेळेवर कॉल न घेणारे, मेसेज ला वेळेवर रिप्लाय न देणारे परंतु आणिबाणीच्या प्रसंगी खंबीरपणे उभे राहणारे (म्हणजे एवढे खंबीर की जर साधा ताप जरी आला तरी तोपर्यंत साथ सोडणार नाही जोपर्यंत ताप जाणार नाही. कदाचित गचकला तर परत यायला नको याची खात्री घेत असतील..? )
           काही स्पेशल मूवी मित्र ज्यांना आपल्याच सोबत नवीन मूवी चा फर्स्ट डे लास्ट शो बघायचा असतो. (हा भाग वेगळा की लग्नासाठी मुलगी बघायला जायच्या वेळेला हे नेमके मित्राला एकटाच पाठवणार..तेव्हा बरोबर कन्नी कापणार)
           असो शेवटी जेवढं मन मोठं तेवढा मित्र परिवार मोठा. (आम्ही खिश्यालाच मन मानतो ही सुचना.) नानाविध प्रकारचे हे जिन्नस मिळून आयुष्याची भेळ झालेली आहे. आणि भेळेचा आणि ठसक्याचा संबंध जास्तच. खऱ्या मित्राचा आदर्श घेण्यासारख्या योगेश्वर श्रीकृष्णाने नाही काय सर्व प्रकारच्या, सर्व चवीच्या पदार्थांचा एकच गोपाळकाला यामुनातीरी केला होता. तसाच या मित्रमंडळींचा गोपाळकाला या वाहत्या जीवन प्रवाहाच्या तटावर होत असतो.
           त्या सर्वांना आठवणे, त्यांचा सन्मान करणं (तो तर खरे मित्र करत नाहीतच, उलट जेवढा जास्त अपमान तेवढी पक्क्की मैत्री) त्यांचं महत्व अबाधित ठेवणं हे आपलं कर्तव्य ( कारण "उपकार थोडी करून राह्यला बे.!" हे वाक्य सदैव ऐकवून कर्तव्यतत्पर राहायला हेच भाग पाडतात) त्यामुळे कर्तव्यच. ह्या कर्तव्याची जाणीव व्हावी म्हणून सर्वांना मैत्रिदिनाच्या शुभेच्छा. ( मुळात शुभेच्छा दिल्या म्हणून 'जास्त फ्लॅश मारून राहिलास का आता, आम्हाले *** शिकवते का?' असले बोलणे खावेच लागेल, पण तरीही हिम्मत करतोच.
           जो जसा आहे त्याला स्वीकारणं आणि स्वतः न बदलता त्याला सांभाळणं (ह्याचा अर्थ त्याला ऊर फुटेस्तोवर शिव्यांची लाखोली वाहणे असाच ) हे खरं आयुष्य.!
आणि म्हणून मित्राची व्याख्या एका शब्दात करा म्हटलं तर एवढंच म्हणीन मित्र म्हणजे आयुष्य..!

मंगलवार, 14 फ़रवरी 2017

ती सध्या काय करते.?

                    ती सध्या काय करते.?” हा प्रश्न सहजच मनात उपस्थित राहिलागोरेपान रंग प्राप्त झालेली ती, सहज सुंदर दिसत असेल कधीतरीकधी काळी लांबसडक काळे केस असतील तिचे.! अतिशय लाडा कोडात वाढलेली गावातील पाटलाची पोर तीशेकडो एकर जमिनीचे मालक तिचे जन्मदातेआणि वारश्याने तिच्या वाट्याला आलेली ती जमीन आणि तो मोठा वाडाएकदम कडक स्वभावाची तीबऱ्याचदा कठोर बोलणारी..आणि तरीही सर्वांना आपल्याभोवती गोळा करून ठेवण्याची सिद्धी तिला होतीमला सुरुवातीला याच भारी आश्चर्य वाटायचं पण जसं जसं माझी समज वाढली तसं त्यामागचं कारण सुद्धा मला कळलं आणि त्याच बरोबर वाईट पण वाटलं!
          कधी कधी जी माहिती मिळायची त्यावरून मला रागही यायचा तिच्या वागणुकीचा पण प्रेम कमी होत नव्हतंपण एक दिवस हाच प्रश्न मनात डोकावला "ती सध्या काय करते.?" आणि दुर्दैव म्हणजे त्याच्याच दुसऱ्या दिवशी दुपारी बहिणीचा मेसेज आला "ती गेली."
          कधी नव्हे ते नेमक्या त्याच रविवारी मी नोकरीशी निगडित कामाने "ऑन ड्युटीबाहेर होतोमनात प्रचंड चलबिचल सुरु झाली, "काय करावे?" काही समजत नव्हतेगेल्या दोन-तीन वर्षात तिच्या भेटीलासुद्धा गेलो नव्हतो मीबऱ्याचदा मनात आलं होतं की एकदा भेटून यावं तिलापण काही ना काही कारणाने राहिलंच भेटणंआणि आता अशी दुर्दैवी बातमीतसं बातमी अनपेक्षित नव्हतीतिची तब्बेत तशीच झालेली होतीत्यामुळे आज ना उद्या काही काळाने ती जाणारंच हे सर्वांनी गृहीत धरलेच होतंपण अशी शेवटची भेट  होता ती कायमची निघून जाईल हे ध्यानी मनी नव्हतेच मुळी माझ्या.
            मी ड्युटी वर असल्यामुळे मित्राला कॉल करून ताबडतोब ट्रेनच्या तिकिटाच्या उप्लब्धतेबद्दल विचारलंत्वरित वरिष्ठांना बोलून निघायला हवं आणि मिळेल त्या ट्रेन ने तिच्या अंत्यविधीला तरी जावं याच विचारात असतांना परत बहिणीचा मेसेज आला की "चुकीची बातमी आली होती". थोडं चेहऱ्यावर हास्य आलेमी परत आपल्या कामाच्या धावपळीत मग्न झालो.
            पण ज्याप्रमाणे फुलपाखरांचे आयुष्य क्षणभंगुर असते तसंच माझ्या या आनंदाचं झालंएका तासाने परत बहिणीने कॉल केलाम्हटलं,"ती गेली!"
            अश्यावेळी बातमी आली की मी निघू शकत नव्हतोआणि निघालो असतो तरी तिचं अंतिम दर्शन मात्र झालं नसतं कारण तिच्यावर हक्क सांगणाऱ्यांनी अंतिम संस्कार दुसऱ्या दिवशी सकाळीच आटोपायचं ठरवलं होतं.
            मनातल्या मनात तिला नमस्कार केलापरमपिता परमेश्वराला हात जोडून विनंती केली की तिला मोक्ष लाभू दे.
आठवडा भरानंतर:-
           "ती गेलीपण आता पुढे कायपुढल्या विधींच काय.? दशक्रिया विधीतेरावं कधी कुठं करणार आहेत?" मी हे जाणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर मला धक्काच बसलातिच्या जिवंतपणी जो प्रकार तिने बघितलातो प्रकार तिच्या मृत्यूनंतर तरी सम्पेल ही आमची आशा फोल ठरली.
           तिच्या जिवंतपणी तिच्या संपत्तीसाठी आपापसात भांडणारी तिची मुलं आज ती मेल्यानंतरही एक झालेली नव्हतीज्या मुलांना तिने आपल्या वडिलोपार्जित संपत्तीचा भाग मुक्तहस्ते वाटला होता त्यांनी फक्त जमिनीच्या तुकडा आपल्या नावे करून घ्यायसाठी तिला एकमेकांकडे फिरवलं होतंआणि खेद म्हणजे आजही तिच्या मृत्यूनंतर तिला एकमेकांकडे वाटून घेत होते.
           भावंडांनी दोन वेगवेगळे अस्थिविसर्जन वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री करायचं ठरवलंदोन वेगवेगळ्या दशक्रिया विधीवेगवेगळ्या ठिकाणी तेराव्याचं जेवण ठरवण्यात आलंका.? मायेवर कोणाचं प्रेम जास्त आहे ते दाखवण्यासाठी की स्वतःचा अहंकार जपण्यासाठीतिच्या मनावरगुणांवरसंस्कारांवर कोणी हक्क सांगितला नाही मात्र संपत्तीवर सांगितला.
          शेवटी माझ्यासारख्या तिच्या हतबल नातवांना हाच प्रश्न पडतो, "ती सध्या काय करते.?" 
             आणि उत्तर हेच कीती सध्या भावंडांच्या यादवीत दोन दोन अस्थिकलशांत राहतेजीवनाचं अंतिम सत्य प्रकट रुपाने मांडतेते सत्य जे गझलसम्राट सुरेश भटांनी स्वतःच्या शब्दांत मांडलंय
         "इतुकेच मला जातांना सरणावर कळले होते
            मरण्याने केली सुटकाजगण्याने छळले होते.!"