रविवार, 6 अगस्त 2017

मित्र म्हणजे हक

         "मित्र म्हणजे...अमुक...मित्र म्हणजे तमुक....." असं कोणी कितीही फिलॉसॉफी झाडली.. तरी मित्र म्हणजे हरामखोर, कमीना (हक) आणि तरीही कायमच हवाहवासा वाटणारा निर्बुद्ध जीव अशीच आपली व्याख्या..
          ह्यांच बोलणं म्हणजे एवढं सोज्ज्वळ की सेन्सॉर बोर्ड ला सुद्धा एवढे बीप बीप टाकावं लागतील की संवादाच्या ऐवजी निव्वळ पिपाणी ऐकू यायची. यांच्या बोलण्याचे विषय आणि त्यांची व्याप्ती एवढी की खोली, उंची, मोजून त्याला कोणत्या ग्रेड मध्ये मान्यता द्यायची याचा विचार करतांना आदरणीय पहलाज काका निहलानी स्वतः पदत्याग करतील.
          काही फक्त वापर करून घेणारे जरी असले तरी स्वतःचा हक्काने वापर करू देणारे बरेच..!
तऱ्हे तऱ्हेचे तऱ्हेवाईक आणि चटपटीत मसालेदार मासलेवाईक अशे विभिन्न प्रकृतीचे हे सर्व.
काही कायमच दुसऱ्यांना गिऱ्हाईक करण्यात धन्यता मानणारे काही नेहमी गिऱ्हाईक होण्यात आनंद मानणारे. रस्त्यावरील अरबट चरबट खाद्यपदार्थ जे कधी प्रकृतीला त्रास देतील अशे काही (मुलींच्या पायातील पादुकांचा आशीर्वाद यांच्यामुळे प्राप्त होण्याची शक्यता जास्तच..)
         काही साक्षात श्रीकृष्णाने अर्जुनास भगवदगीता सांगावी तशे उपदेश देणारे तर काही सिनेमॅटोग्राफर स्टाईल ने उभे करून पोज द्यायला लावणारे. सदा रडत असणारे जशे 'विषाद योगाचं' अनुभव घडवतात तसेच काही सदा न कदा 'हास्ययोग' घडवत असतात (या हास्ययोगात मांसाहारी विनोदायाम जास्त असतात हा भाग अलाहिदा).
           कधी वेळेवर कॉल न घेणारे, मेसेज ला वेळेवर रिप्लाय न देणारे परंतु आणिबाणीच्या प्रसंगी खंबीरपणे उभे राहणारे (म्हणजे एवढे खंबीर की जर साधा ताप जरी आला तरी तोपर्यंत साथ सोडणार नाही जोपर्यंत ताप जाणार नाही. कदाचित गचकला तर परत यायला नको याची खात्री घेत असतील..? )
           काही स्पेशल मूवी मित्र ज्यांना आपल्याच सोबत नवीन मूवी चा फर्स्ट डे लास्ट शो बघायचा असतो. (हा भाग वेगळा की लग्नासाठी मुलगी बघायला जायच्या वेळेला हे नेमके मित्राला एकटाच पाठवणार..तेव्हा बरोबर कन्नी कापणार)
           असो शेवटी जेवढं मन मोठं तेवढा मित्र परिवार मोठा. (आम्ही खिश्यालाच मन मानतो ही सुचना.) नानाविध प्रकारचे हे जिन्नस मिळून आयुष्याची भेळ झालेली आहे. आणि भेळेचा आणि ठसक्याचा संबंध जास्तच. खऱ्या मित्राचा आदर्श घेण्यासारख्या योगेश्वर श्रीकृष्णाने नाही काय सर्व प्रकारच्या, सर्व चवीच्या पदार्थांचा एकच गोपाळकाला यामुनातीरी केला होता. तसाच या मित्रमंडळींचा गोपाळकाला या वाहत्या जीवन प्रवाहाच्या तटावर होत असतो.
           त्या सर्वांना आठवणे, त्यांचा सन्मान करणं (तो तर खरे मित्र करत नाहीतच, उलट जेवढा जास्त अपमान तेवढी पक्क्की मैत्री) त्यांचं महत्व अबाधित ठेवणं हे आपलं कर्तव्य ( कारण "उपकार थोडी करून राह्यला बे.!" हे वाक्य सदैव ऐकवून कर्तव्यतत्पर राहायला हेच भाग पाडतात) त्यामुळे कर्तव्यच. ह्या कर्तव्याची जाणीव व्हावी म्हणून सर्वांना मैत्रिदिनाच्या शुभेच्छा. ( मुळात शुभेच्छा दिल्या म्हणून 'जास्त फ्लॅश मारून राहिलास का आता, आम्हाले *** शिकवते का?' असले बोलणे खावेच लागेल, पण तरीही हिम्मत करतोच.
           जो जसा आहे त्याला स्वीकारणं आणि स्वतः न बदलता त्याला सांभाळणं (ह्याचा अर्थ त्याला ऊर फुटेस्तोवर शिव्यांची लाखोली वाहणे असाच ) हे खरं आयुष्य.!
आणि म्हणून मित्राची व्याख्या एका शब्दात करा म्हटलं तर एवढंच म्हणीन मित्र म्हणजे आयुष्य..!

2 टिप्‍पणियां: