रविवार, 19 अगस्त 2018

संकटात केरळ- तत्पर भारतीय



आदरणीय सज्जनहो,
                  आज केरळ संकटात आहे...! देवभूमी अक्षरशः जलभूमी झाली आहे.!
तेथील कार्यकर्त्यांशी माझं बोलणं झालं, तेव्हा लक्षात आलं की परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे.! लोकांना आपली घरेदारे सोडून निर्वासित व्हावं लागलंय.
                 भारतीय सैन्यदल भूदल, नौदल वायुदल; तसेच तटरक्षक दल, आईटीबीपी, सीआरपीएफ आदि निमलष्करी दल यांच्या तुकड्या बचावकार्यात लागल्या आहेत.! भारतीय रेल्वेने पिण्याचं पाणी, दूध यांची वाहतूक करण्यात आपली मदत दिलेली आहे.! विभिन्न राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी करोडो रुपयाचे मदत निधी जाहीर केलेत.!


                सेवा भारती, ईशा फौंडेशन, शीख बांधवांच्या संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विभिन्न उपासना पद्धतींच्या धार्मिक संस्था ह्या मदतकार्यात सक्रिय झालेल्या आहेत. (सगळ्यांची नावं लिहायला गेलं तर एक पूर्ण उतारा लिहावा लागेल).
आपणही आपल्या परीने त्यांच्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे.!

                मी ज्यावेळी समाजामध्यमांतुन मदतीच्या आवाहनाचे मेसेज प्रसारित करत होतो तेव्हा बऱ्याच जणांचे संदेश आलेत की आम्ही केलेत आणि त्यांनी स्क्रीनशॉट पाठवलेत.
माझ्या परिचयातील बऱ्याच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा यथाशक्ती होईल तेवढा मदतनिधी विभिन्न संस्थांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दान दिला आहे. खरंच हे सर्व बघून आनंद वाटला की कोणी सांगताच आमची युवाशक्ती जागृत झालेली आहे.    


 

               भारतीय सैन्यदलातील जवान, निमलष्करी दल, भारतीय रेल्वे, केरळ सरकारच्या  विविध संस्थांचे कर्मचारी ह्या बचाव कार्यात अहोरात्र झटून राहिलेले आहेत. त्या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच, त्यांचे आभार मानायला शब्द अपुरे पडतील.
               आसेतुहिमाचल भारत एक आहे आणि भारतीय कोणत्याही कोपऱ्यात असो तो माझा बंधू आहे ह्या भावनेने आपण सर्व ह्या आपदा प्रसंगी केरळ मधील भारतीयांच्या पाठीशी उभे राहुयात हीच विनंती.!
                 जनसेवा ही ईश्वरभक्ती बोध यातला उमजुया.!
                   विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगुया.!

                                                आपला नम्र 
                                             एक सामान्य भारतीय

विशेष टीप :-
आपल्याला आर्थिक मदत करायची असल्यास आपण निधी थेट सेवाभावी संघटनांना देऊ शकता काही संघटनांची माहिती देतोय त्यांच्याशी संपर्क करून आपण मदतीचा हात देऊ शकता.
1)   SEVA BHARATHI ERNAKULAM
ACC NO. 740402010000347
BANK NAME: UNION BANK OF INDIA
IFSC CODE:  UBIN0574040
JAWAHAR NAGAR KADVANTHARA, ERNAKULAM, KERALA
2)   RSS JANKALYAN SAMITI, MAHARASHTRA
3)   CM RELIEF FUND KERALA

शुक्रवार, 17 अगस्त 2018

आमच्या किशोरवयातील महानायक अमर अटलजी

                         
                                  "भरी दुपहरी में अंधियारा
                                     सूरज परछाई से हारा
                                   अंतःतम का नेह निचोड़े
                                    बुझी हुई बाती सुलगाये
                                  आओ फिर से दिया जलाये"
                    काल सकाळी मी आणि आशिष अल्पोहार करत असतांना आदरणीय अटलजींच्या ढासळत्या प्रकृतीचा विषय निघाला त्यावेळी माझ्या ओठी अटलजींच्या ह्या ओळी आल्या. अटलजींच्या राजकीय जीवनाची, पंतप्रधान म्हणून त्यांच्या कार्याची चर्चा आम्ही करत असतांना विषय त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक गुणवैशिष्ट्यांना स्पर्शत होता. अटलजींचं व्यक्तिमत्व एवढं उत्तुंग आणि आम्ही मात्र अल्पज्ञ तरुण, ह्यामुळे त्या गोष्टीतील अंध मनुष्यांप्रमाणे आमची अवस्था होती जी हत्तीच्या आकार आणि रूपाचा अंदाज लावतात.
                   संध्याकाळच्या मावळत्या सुर्याबरोबरच अटलबिहारी वाजपेयी नावाचा तेजोसूर्य अस्त झाल्याची दुःखद बातमी आली. साऱ्या देशात दुःखाची शोक काजळी पसरली. माझ्याही मनात दुःखाचे ढग दाटले आणि मन माझ्या किशोरवयीन जीवनात गेलं.
                  ०७ वी ते १२ वी म्हणजे ऐन वाढीची किशोरावस्था; बाल्यावस्थेतून तारुण्यात जातांना लागणारी अल्पकालीन अवस्था. फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक, वैचारिक बदलांचं  सुद्धा हे वय.! मी या वयात असतानाच्या काळात अटलजी देशाचे पंतप्रधान होते. मुळातच लहानपणापासून आई बाबांच्या तोंडून अटलजींविषयी ऐकत आलो आहे. आई-बाबा अटलजींच्या वक्तृत्वशैलीचे तथा विचारांचे चाहते आहेत. त्यामुळे ज्या वयात राजकारण समजत नव्हतं त्या वयात सुद्धा अटलजींचं चित्र असलेले बिल्ले, स्टिकर्स मी गोळा करून ठेवत असे.
                 पंतप्रधान असल्यामुळे रोजच्या वर्तमानपत्रांत कोणत्या ना कोणत्या बातमीत त्यांच्या नावाचा उल्लेख न चुकता असायचा. त्यावेळी नव्याने सुरू झालेल्या खाजगी वृत्तावहिन्यांमुळे त्यांची संसदेतील भाषणं, एखाद्या कार्यक्रमातील भाषणं त्या किशोरवयात ऐकण्याची, ती शैली अनुभवण्याची सुवर्ण संधी आमच्या पिढीला लाभली.
                १९९९ ला झालेल्या कारगिल युद्धात आमच्या सैनिकांनी जो अभूतपूर्व पराक्रम गाजवला त्यामुळे भारतीय भूमीत घुसखोरी केलेल्या शत्रूराष्ट्राला पराभूत होऊन मागे सरावं लागलं आणि 'नापाक' इरादे असणाऱ्या राष्ट्राची अवस्था "आपलेच दात आपल्याच घशात" अशी झाली होती. ह्या संपूर्ण बिकट प्रसंगी करोडो भारतीयांच्या विश्वासाला खरं उतरणारे कणखर व खंबीर नेतृत्व अटलजींच्या रूपाने भारतीय सैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं होतं. कारगिल विजयानंतर शहीद कॅप्टन विक्रम बत्रा, शहीद कॅप्टन अनुज हे महापराक्रमी भारतीय सैनिक आमचे नायक झाले; त्याचबरोबरीने ह्या किशोरवयात आमचे महानायक झाले 'अटलजी' अर्थात तत्कालीन पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी'!
'पोखरण अणुस्फोटानंतर
                      अटलजींच्या राष्ट्रभक्तीपूर्ण पाठिंब्याने व डाँ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्यांच्या नेतृत्वाने पार पडल्या गेलेल्या 'पोखरण अनुचाचणीचे' महत्व त्या वयात निश्चितच कळलेलं नव्हतं, पण तारुण्यात पदार्पण केल्यानंतर जसं जसं जग कळायला लागलं तसं 'पोखरण अणुस्फोटाच' महत्व आणि आवश्यकता पटली, त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदरभाव अधिक दृढ झाला.
                    "जय जवान; जय किसान; जय विज्ञान!" अशी घोषणा देणाऱ्या अटलजींच्या कार्यकाळात क्रियान्वयन झालेल्या 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना' ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवणारी होती. 'सुवर्ण चतुष्कोण', 'प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना' ह्यांच्या माध्यमातून आसेतुहिमाचल भारताला एका धाग्यात ओवण्याच्या त्यांच्या कल्पनेला सलाम.
                    मुळातच एक पत्रकार, साहित्यिक असलेले अटलजी कविहृदयाचे. त्यांच्या कवितांनी पिढ्यांना भुरळ घातलेली आहे.  "औरों के घर आग लगाने का जो सपना, वह अपने ही घर में सदा खरा होता है!" काव्यस्वरूपात असं शेजारी राष्ट्राला इशारा देणारे अटलजी म्हणजे मृदू काव्यातून उमगलेले कणखर प्रशासक. "गीत नहीं गाता हूं!" असं म्हणत निराश झालेल्या तारुण्याला "गीत नया गाता हूं!" असा आशेचा किरण दाखवणारे स्फूर्तिदायी नेतृत्व म्हणजे अटलजी!
                          "क्या हार में क्या जीत में
                             किंचित नहीं भयभीत मैं
                          कर्तव्य पथ पर जो भी मिला
                          यह भी सही वह भी सही"   हे तत्व अनुसरणात आणून जीवनक्रम व्यतीत करणारे निष्काम कर्मयोगी म्हणजे अटलजी!
                        "होकर स्वतंत्र कब मैने चाहा कर लुं सबको गुलाम
                           मैने तो सदा सिखाया है करना अपने मन को गुलाम
                           गोपाल राम के नामों पर कब मैने अत्याचार किया
                          कब दुनिया को हिंदू करने घर घर मे नरसंहार किया
                          भूभाग नहीं शत शत मानव के हृदय जीतने का निश्चय
                            हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय"
          जगाला असं अभिमानाने सांगतांना अटलजींच्या आतील सच्चा संघ स्वयंसेवकाच्या अभिव्यक्तीचे समाजाला दर्शन होतं.
                 अटलजींच्या काव्यपंक्ती वापरून मी शालेय, महाविद्यालयीन जीवनात अनेक वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवलीत. आजही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये  बोलतांना मी त्यांच्या काव्यपंक्तीचा सहजतेने वापर करत असतो.

अंतिम यात्रेला मार्गक्रमण

                          "मौत की उमर क्या है?, दो पल भी नहीं
                         जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं
                          मैं जी भर जिया, मैं मन से मरू
                         लौटकर आऊँगा, कूच से क्यूँ डरूं?"
                  मृत्युच अटळ सत्य अश्या पद्धतीने समजून घेत सदाचारणाने मार्गक्रमण करणारा राजकारणी आज अंतिम यात्रेला निघाला. पंचतत्त्वात विलीन झाल्यानंतरही त्यांच्या राष्ट्रवाद विचारांनी, राष्ट्रभक्त कृतींनी, तेजस्वी साहित्याने तथा ओजस्वी वाणीने  अटलजी सदा 'अटल' 'अमर' राहतील.
                 "मगर यह देश रहना चाहीये!  इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहीये!" या त्यांच्या आर्जवी शब्दांना अनुसरून आपण सव्वाशे करोड भारतीय आपापसातील भेद विसरून, हातात हात घालून राष्ट्रविकासाच्या कार्यात अग्रेसर होऊयात हीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.!
                                  "बाधाए आती है आये,
                                 घिरे प्रलय की घोर घटाएँ
                                     पावों के नीचे अंगारे,
                            सिर पर बरसे यदि ज्वालाएँ
                              निज हांथो में हंसते हंसते
                          आग लगाकर जलना होगा
                           कदम मिलाकर चलना होगा!"