शुक्रवार, 17 अगस्त 2018

आमच्या किशोरवयातील महानायक अमर अटलजी

                         
                                  "भरी दुपहरी में अंधियारा
                                     सूरज परछाई से हारा
                                   अंतःतम का नेह निचोड़े
                                    बुझी हुई बाती सुलगाये
                                  आओ फिर से दिया जलाये"
                    काल सकाळी मी आणि आशिष अल्पोहार करत असतांना आदरणीय अटलजींच्या ढासळत्या प्रकृतीचा विषय निघाला त्यावेळी माझ्या ओठी अटलजींच्या ह्या ओळी आल्या. अटलजींच्या राजकीय जीवनाची, पंतप्रधान म्हणून त्यांच्या कार्याची चर्चा आम्ही करत असतांना विषय त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक गुणवैशिष्ट्यांना स्पर्शत होता. अटलजींचं व्यक्तिमत्व एवढं उत्तुंग आणि आम्ही मात्र अल्पज्ञ तरुण, ह्यामुळे त्या गोष्टीतील अंध मनुष्यांप्रमाणे आमची अवस्था होती जी हत्तीच्या आकार आणि रूपाचा अंदाज लावतात.
                   संध्याकाळच्या मावळत्या सुर्याबरोबरच अटलबिहारी वाजपेयी नावाचा तेजोसूर्य अस्त झाल्याची दुःखद बातमी आली. साऱ्या देशात दुःखाची शोक काजळी पसरली. माझ्याही मनात दुःखाचे ढग दाटले आणि मन माझ्या किशोरवयीन जीवनात गेलं.
                  ०७ वी ते १२ वी म्हणजे ऐन वाढीची किशोरावस्था; बाल्यावस्थेतून तारुण्यात जातांना लागणारी अल्पकालीन अवस्था. फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक, वैचारिक बदलांचं  सुद्धा हे वय.! मी या वयात असतानाच्या काळात अटलजी देशाचे पंतप्रधान होते. मुळातच लहानपणापासून आई बाबांच्या तोंडून अटलजींविषयी ऐकत आलो आहे. आई-बाबा अटलजींच्या वक्तृत्वशैलीचे तथा विचारांचे चाहते आहेत. त्यामुळे ज्या वयात राजकारण समजत नव्हतं त्या वयात सुद्धा अटलजींचं चित्र असलेले बिल्ले, स्टिकर्स मी गोळा करून ठेवत असे.
                 पंतप्रधान असल्यामुळे रोजच्या वर्तमानपत्रांत कोणत्या ना कोणत्या बातमीत त्यांच्या नावाचा उल्लेख न चुकता असायचा. त्यावेळी नव्याने सुरू झालेल्या खाजगी वृत्तावहिन्यांमुळे त्यांची संसदेतील भाषणं, एखाद्या कार्यक्रमातील भाषणं त्या किशोरवयात ऐकण्याची, ती शैली अनुभवण्याची सुवर्ण संधी आमच्या पिढीला लाभली.
                १९९९ ला झालेल्या कारगिल युद्धात आमच्या सैनिकांनी जो अभूतपूर्व पराक्रम गाजवला त्यामुळे भारतीय भूमीत घुसखोरी केलेल्या शत्रूराष्ट्राला पराभूत होऊन मागे सरावं लागलं आणि 'नापाक' इरादे असणाऱ्या राष्ट्राची अवस्था "आपलेच दात आपल्याच घशात" अशी झाली होती. ह्या संपूर्ण बिकट प्रसंगी करोडो भारतीयांच्या विश्वासाला खरं उतरणारे कणखर व खंबीर नेतृत्व अटलजींच्या रूपाने भारतीय सैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं होतं. कारगिल विजयानंतर शहीद कॅप्टन विक्रम बत्रा, शहीद कॅप्टन अनुज हे महापराक्रमी भारतीय सैनिक आमचे नायक झाले; त्याचबरोबरीने ह्या किशोरवयात आमचे महानायक झाले 'अटलजी' अर्थात तत्कालीन पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी'!
'पोखरण अणुस्फोटानंतर
                      अटलजींच्या राष्ट्रभक्तीपूर्ण पाठिंब्याने व डाँ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्यांच्या नेतृत्वाने पार पडल्या गेलेल्या 'पोखरण अनुचाचणीचे' महत्व त्या वयात निश्चितच कळलेलं नव्हतं, पण तारुण्यात पदार्पण केल्यानंतर जसं जसं जग कळायला लागलं तसं 'पोखरण अणुस्फोटाच' महत्व आणि आवश्यकता पटली, त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदरभाव अधिक दृढ झाला.
                    "जय जवान; जय किसान; जय विज्ञान!" अशी घोषणा देणाऱ्या अटलजींच्या कार्यकाळात क्रियान्वयन झालेल्या 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना' ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवणारी होती. 'सुवर्ण चतुष्कोण', 'प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना' ह्यांच्या माध्यमातून आसेतुहिमाचल भारताला एका धाग्यात ओवण्याच्या त्यांच्या कल्पनेला सलाम.
                    मुळातच एक पत्रकार, साहित्यिक असलेले अटलजी कविहृदयाचे. त्यांच्या कवितांनी पिढ्यांना भुरळ घातलेली आहे.  "औरों के घर आग लगाने का जो सपना, वह अपने ही घर में सदा खरा होता है!" काव्यस्वरूपात असं शेजारी राष्ट्राला इशारा देणारे अटलजी म्हणजे मृदू काव्यातून उमगलेले कणखर प्रशासक. "गीत नहीं गाता हूं!" असं म्हणत निराश झालेल्या तारुण्याला "गीत नया गाता हूं!" असा आशेचा किरण दाखवणारे स्फूर्तिदायी नेतृत्व म्हणजे अटलजी!
                          "क्या हार में क्या जीत में
                             किंचित नहीं भयभीत मैं
                          कर्तव्य पथ पर जो भी मिला
                          यह भी सही वह भी सही"   हे तत्व अनुसरणात आणून जीवनक्रम व्यतीत करणारे निष्काम कर्मयोगी म्हणजे अटलजी!
                        "होकर स्वतंत्र कब मैने चाहा कर लुं सबको गुलाम
                           मैने तो सदा सिखाया है करना अपने मन को गुलाम
                           गोपाल राम के नामों पर कब मैने अत्याचार किया
                          कब दुनिया को हिंदू करने घर घर मे नरसंहार किया
                          भूभाग नहीं शत शत मानव के हृदय जीतने का निश्चय
                            हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय"
          जगाला असं अभिमानाने सांगतांना अटलजींच्या आतील सच्चा संघ स्वयंसेवकाच्या अभिव्यक्तीचे समाजाला दर्शन होतं.
                 अटलजींच्या काव्यपंक्ती वापरून मी शालेय, महाविद्यालयीन जीवनात अनेक वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवलीत. आजही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये  बोलतांना मी त्यांच्या काव्यपंक्तीचा सहजतेने वापर करत असतो.

अंतिम यात्रेला मार्गक्रमण

                          "मौत की उमर क्या है?, दो पल भी नहीं
                         जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं
                          मैं जी भर जिया, मैं मन से मरू
                         लौटकर आऊँगा, कूच से क्यूँ डरूं?"
                  मृत्युच अटळ सत्य अश्या पद्धतीने समजून घेत सदाचारणाने मार्गक्रमण करणारा राजकारणी आज अंतिम यात्रेला निघाला. पंचतत्त्वात विलीन झाल्यानंतरही त्यांच्या राष्ट्रवाद विचारांनी, राष्ट्रभक्त कृतींनी, तेजस्वी साहित्याने तथा ओजस्वी वाणीने  अटलजी सदा 'अटल' 'अमर' राहतील.
                 "मगर यह देश रहना चाहीये!  इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहीये!" या त्यांच्या आर्जवी शब्दांना अनुसरून आपण सव्वाशे करोड भारतीय आपापसातील भेद विसरून, हातात हात घालून राष्ट्रविकासाच्या कार्यात अग्रेसर होऊयात हीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.!
                                  "बाधाए आती है आये,
                                 घिरे प्रलय की घोर घटाएँ
                                     पावों के नीचे अंगारे,
                            सिर पर बरसे यदि ज्वालाएँ
                              निज हांथो में हंसते हंसते
                          आग लगाकर जलना होगा
                           कदम मिलाकर चलना होगा!"
    

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें