मंगलवार, 30 सितंबर 2014

नवरात्रि-शक्तिची उपासना, उत्सव मातृत्वाचा



                       "नवरात्रि शक्ति का पर्व है
                     नवरात्रि शुध्दिकरण का पर्व है"
         काल रात्रि टीव्ही वर अमेरिकेतील न्यूयॉर्क मधील जगप्रसिध्द टाइम्स स्क्वेअर मधील मैडिसन स्क्वेअर गार्डन या विख्यात सभागृहात होत असलेला एक सोहळा बघत होतो, तेव्हा ऐकलेले हे वाक्य. हे वाक्य ज्या व्यक्तीने उच्चारले त्या व्यक्तिच्या सन्मानासाठी आयोजित केल्या गेलेला हा सोहळा अभूतपूर्व नि अदभुत असाच म्हणावा लागेल.
         मी तर आपला मोबाइल बंद करून हा कार्यक्रम सहपरिवार बघत होतो. हा कार्यक्रम आपले मानणीय पंतप्रधान श्री नरेन्द्रजी मोदी यांच्या अमेरिका भेटीप्रसंगी तेथील भारतीय समुदायानी त्यांच्या आदरातिथ्यासाठी हा दिमाखदार कार्यक्रम आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमातील आपल्या उदबोधनाला सुरवात करताना नरेन्द्र मोदींनी वरील वाक्य उच्चारले, "नवरात्रि शक्ति का पर्व है, नवरात्रि शुध्दिकरण का पर्व है.!"
खरोखर आपण सर्व विचार केला तर आपले सुध्दा नवरात्रि विषयी आपल्या पंतप्रधानांच्या मतासारखेच विचार आहेत. आपण मोठ्या भक्तिभावाने हा नवरात्रि उत्सव साजरा करतो. बरेच जन दिवस निरंकार उपवास ठेवतात, कोणी दिवस पादत्राण घालत नाहीत, आदि अनेक रीतीने व्रत ठेवतात.
         पण सर्वात मोठा विचार केला तर नवरात्रि हा शक्ति उपासनेचा उत्सव आहे.
                      "या देवी सर्व भूतेषु शक्ति रुपेन संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमा: "
        या पध्दतीने आपण आदिमाया देवीची शक्तिरुपात आराधना करतो, म्हणजे शक्तिची उपासना करतो. कारण स्पष्ट आहे जर आपल्याला जगात अभिमानाने उभे रहायचे असेल तर शक्तिसंपन्न होणे गरजेचे आहे. देवीने महिषासुराचा वध केला तो शक्तीच्या आधारानेच. हातातील शस्त्रानि. आज जेव्हा भारत चहु बाजूनी वेढला गेला असताना आपल्या राष्ट्राची सामरिक शक्ति सम्पन्नता वाढवणे गरजेचे आहे. मग त्यासाठी आपल्या लष्कर, नौदल वायुदल आणि निमलष्करी दल यांना आवश्यक आधुनिक शस्त्रास्त्रे उपलब्ध करून द्यावी लागतील. आंतरिक सुरक्षा सांभाळणारया पोलिस दलाला पुरेश्या सुविधा पुरवने गरजेचे आहे. जेणेकरून कोणीही आंतरिक वा बाह्य शत्रु आपल्याकड़े वाकड्या नजरेनी बघणार नाही.
         फ़क्त सामरिक दृष्टयाच नाही तर बौद्धिक आर्थिक शक्ति संपन्नता येने सुद्धा अतिशय निकडेची. आज साऱ्या जगात भारतीय बुध्दिमत्तेला मागणी आहे. जगातील डॉक्टर्स, अभियंते, सॉफ्टवेर प्रोफेशनल, शिक्षक  हे भारतीय वंशाचे आहेत. आज बड्या बड्या कंपनीचे प्रमुखपदी भारतीय वंशाचे लोक आहेत. उदाहरणच घ्यायचे झाल तर माइक्रोसॉफ्ट या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सत्या नडेला यांची निवड होणे.
         गेल्या काही वर्षात आपण तंत्रज्ञान क्षेत्रात शक्तिसंपन्न होण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे पावले उचलली आहेत. डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात आपण अग्नि पृथ्वी नाग त्रिशूल आदि क्षेपनास्त्रे निर्माण केलीत. नुकत्याच झालेल्या एका गौरवास्पद घटनेचा आपणास सन्दर्भ घ्यावाच लागेल. आपल्या अवकाश संशोधन संस्था ईसरो (ISRO) नि मंगळ ग्रहावर आपले यान पाठवले. या मोहिमेची विशेषता म्हणजे पहिल्याच प्रयत्नात आपण यश प्राप्त केले. तसेच सर्वात मोठी विशेषता अभिमानाची बाब म्हणजे अवघ्या ४५० कोटि मधे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून ही मोहिम यशस्वी केल्या गेली.
                                  "बलहीनों को कोई पुछता
                बलवानो को विश्व पूजता."
ह्या नियमाला लक्षात ठेवून आज आपली शक्तिसंपन्न होण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरु आहे.
मात्र ही शक्तिसंपन्नता येण्यासाठी कारणीभुत असते ती म्हणजे देवी, जिला आपण माता म्हणतो. मुळात या मातेच्या पूजनाचा उत्सव म्हणजे नवरात्र. कुठल्याही उर्जेची, कुठल्याही नवनिर्माणाच्या मुळाशी असते माता.
                                   "तू दुर्गा तू भवानी
                 संसाराची तूच जननी
                 सारी माया तुझी
                  अम्बे कृपा करी..!"
असे म्हणत आम्ही त्या आदिश्क्तिच्या मातृरुपाचेच आवाहन करतो. नवरात्रात कुमारिका पुजनाची पध्दत रूढ़ आहे. आपण लहान लहान बालिकाना घरी बोलावून त्यांचे पूजन करतो, त्यांना गोड खाऊ घालतो. हे सर्व याच साठी की त्यांच्यात देवीचा अंश असतो. मग आपण गर्भातील उमलत्या कळया खुड़ताना त्यांच्या देवी स्वरुपाचे स्मरण का करत नाही.
         मागल्या वर्षी वंशवेल नावाचा सुंदर मराठी चित्रपट आला होता ज्यात स्त्रीगर्भाची कशी ह्त्या होते नि यात सुशिक्षित म्हणल्या जाणारे लोक कसे सामील असतात याचे विदारक पण सत्य चित्रिकरण होते. फ़क्त मुलगाच पाहिजे या हट्टापायी संसार उध्वस्त करणारी कथा "मोकळा श्वास" या चित्रपटाच्या माध्यमातून मांडल्या गेली होती.
         काय दुःखद आणि विदारक दुजाभाव आहे बघा, एकी कड़े आपण देवी प्रसन्न व्हावी म्हणून बालिकांचे पूजन करतो नि दूसरीकड़े जन्माला यायच्या आधीच गर्भात हत्या करतो. आज गर्भाच्या आतच नाही तर बाहेर रस्त्यावर सुध्दा आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहित. पुरुषी मानसिकतेचा राक्षसी चेहरा आपण दोन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेत पाहिले. आपल्याला खरोखर देवीची आराधना करायची आहे तर आज आपण स्त्रीच्या मातृत्वाचा सन्मान करायला सुरवात करणे गरजेचे आहे.
         नवरात्रिनंतर येते विजयादशमी, म्हणजे विजयाचा जल्लोष. रावणाचा वध, पांडवांचे पुनरागमन, महिषासुराचा वध म्हणजेच नीतिचा अनीतिवर, सत्याचा असत्यावर, धर्माचा अधर्मावर विजय. या नवरात्राच्या समाप्ति होत असताना आपण प्रण घेऊया, आपला देश शक्तिसंपन्न, बलवान बनवण्यासाठी झटण्याचा आणि आदि आनादी शक्तीचे चिरंतन स्त्रोत असणाऱ्या मातृशक्तिचे म्हणजे स्त्रीवर्गाचे सन्मान कायम अबाधित ठेवण्याची प्रतिज्ञा घेऊया.




कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें