मंगलवार, 30 अगस्त 2016

माझे गुरू-माझे सर-खरवडे सर

                           "सर! प्लीज त्याच्या ऍडमिशन साठी होकार द्या. प्लीज! चांगला मुलगा आहे, दहावीला मार्क्स चांगले आहेत. थोडा उशीर झालाय, पण आताही तुम्ही म्हटलं तर होऊ शकते.!", ने. हि. महाविद्यालय, ब्रह्मपुरीतील ज्युनिअर कॉलेज विभागातील एक प्राध्यापक आपल्या प्राचार्यांना विनंती करत होते.
रात्रीचे ०८ वाजले होते, ज्याच्यासाठी बोलणं सुरु होतं तो १५ वर्षीय मुलगा बाहेर वऱ्हांड्यात चिंताग्रस्त होऊन बसून होता. थोड्यावेळाने प्राध्यापक बाहेर आलेत आणि आनंदात त्या मुलाला म्हणाले, "उद्या सकाळी ११ वाजता सर्व कागदपत्र घेऊन प्रवेश समितीसमोर हजर राहा.!" दुसऱ्या दिवशी त्या मुलाची ऍडमिशन झाली.
                          त्या सामान्य मुलासाठी तो क्षण आयुष्य बदलवणारा ठरला. तो सर्वसामान्य मुलगा म्हणजे मी-ज्ञानेश्वर जगन्नाथराव गेटकर आणि ते प्राध्यापक म्हणजे प्रा. जयंतराव खरवडे. माझे गुरू-माझे सर-खरवडे सर.
                         तब्बल १४वर्षे लोटलीत पण तो प्रसंग अजूनही हृदयात ताजातवानाच आहे.
                          प्रा. जयंतराव खरवडे सर ने. हि. महाविद्यालयात ज्युनिअरला(म्हणजे ११-१२वी) रसायनशास्त्र (केमिस्ट्री) विषयाचे प्राध्यापक म्हणून विद्यादानाचे कार्य करतात. मला ११वी-१२वीत त्यांनीच शिकवलं. तसं माझं आणि त्यांचा संबंध 'विद्यार्थी-शिक्षक' असा ११ वी पासून झाला. त्याआधी मी लहानपणी त्यांना भाऊजीच म्हणायचो. सरांच्या सुविद्य पत्नी प्रा. सविताताई यांचं माहेर (वठे परिवार) आमच्या घराजवळच असल्याने आम्ही सर्वांना पारिवारिक नात्यांनीच हाक मारतो-'मनोजभाऊ, श्रीपाददादा, किशोर दादा आणि सविताताई.!' त्यामुळे आपसूक खरवडे सर 'भाऊजी'. माझी ऍडमिशन होईस्तोवर मी भाऊजीच म्हणायचो. पण नंतर सर म्हणायला सुरुवात केली आणि कायमचं आता सर.!
                        प्रा. खरवडे सर म्हणजे एक उत्साही पण संयमी व्यक्तिमत्व. आपल्या बोलण्याने कोणाचं मन दुखायला नको याची सतत काळजी घेणारे. म्हणजे वर्गात सुद्धा कोणाला रागवायचं असेल तर 'सौम्य' शब्दांचा प्रयोग करणारे. "काय राजाभाऊ?" असं संबोधन करत विद्यार्थ्यांना समज देणारे आमचे सर. सरांना केमिस्ट्रीचे सर्व फॉर्मुले पाठ असत. 'किटोन्स' असो की अल्डेहाईड्स', 'अमाईन्स' असो की 'ऍसिड', 'इथेन' असो की 'अल्कोहोल' सर्व रिऍक्शन्स सरांना तोंडपाठ. कधी पुस्तक उघडून सांगितलं असं आठवतच नाही एवढं त्यांची या सर्व ऑर्गॅनिक मटेरिअल्स सोबत घट्ट केमिस्ट्री जुळली होती. 'पॉलिमर चैन' असो वा 'नायलॉन' चे धागे, सर्व हायड्रोकार्बोन्स कसे गुंफायचे हे त्यांना पक्के ठाऊक. (म्हणूनच कदाचित अवतीभोवती असंख्य सज्जनांना सत्कार्यासाठी गुंफण्याचं कार्य सरांना सहज जमते.!)
                     कॉलेजमधील कोणताही कार्यक्रम असो, वक्तृत्व असो वा प्रश्नमंजुषा, किंवा 'कॉलेज डे' मधील सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायला सर स्वतः सोबत असायचे. मी कॉलेजला असतांना बऱ्याच निबंध, वक्तृत्व, वादविवाद ,प्रश्नमंजुषा स्पर्धांना बक्षिसे मिळवली, त्याचं बरेचसे श्रेय सरांना जाते.
सर आमच्या बॅचचे वर्गशिक्षक होते. त्यामुळे त्यांचं आमच्या लहान सहान हरकतींकडे बारीक लक्ष असायचं. १२ व्या वर्गात वर्गप्रमुख (सी आर) व सहप्रमुख निवडण्यासाठी लोकशाही पद्धतीने खुली निवडणूक झाली. वर्गातील १४० पेक्षा जास्त विद्यार्थी मित्रांनी त्यात मतदान केलं आणि मी सुमारे २/३ मते घेऊन वर्गप्रमुख म्हणून निवडून आलो. यामुळे आता नवीनच समीकरण तयार झाले, 'खरवडे सर-क्लासटीचर': 'ज्ञानेश्वर गेटकर-वर्गप्रमुख'. आणि हे इक्वेशन बॅलन्स ठेवण्याची माझी जबाबदारी मात्र दहा पटींनी वाढली.
                       अशातच एक वाईट प्रसंग घडला. कोणीतरी आमच्या वर्गातील फळ्यावर घाणेरडी शिवी लिहून ठेवली. याची तक्रार मुलींनी ताबडतोब खरवडे सरांना केली. सर रागारागातच वर्गात आले, सर्वांना विचारणा झाली. पण कोणीच सांगेना की हे उपद्व्याप कोणी केले. शेवटी वर्गप्रमुख नात्याने मला उभं केल्या गेलं आणि सरांनी मला म्हटलं," वर्गप्रमुख म्हणून शिस्त सांभाळणे तुझी जबाबदारी आहे. तू मला लवकरात लवकर दोषी शोधून दे ,अन्यथा मी तुमच्या बॅचला क्लास टीचर म्हणून राहणार नाही." मी घाबरलो, सर्व विद्यार्थी घाबरले. एका नालायक मुलाच्या चुकीमुळे एवढे चांगले सर आपल्याला लाभणार नाहीत याच सर्वांनाच वाईट वाटायला लागली. पण करणार काय.? खरं म्हणजे हे घाण कृत्य कोणी केलं ते कोणालाच माहिती नव्हतं.
सर वर्गातून तडक निघून गेले. मी मग चेतन-निकेतन गुंजेकार ला ताबडतोब सर्व बदमाश मुलांशी बोलून माहिती काढायला सांगितलं. मी, अनुप पचारे, रोशन जयस्वाल, पंकज धोटे आम्ही सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने याच्या मागे लागलो. काही वेळात अक्खा वर्ग आपापल्या परीने हे प्रकरण मिटवण्याच्या मागे लागला. दिवसाअंती असं कळलं की दुसऱ्या वर्गातील एका बदमाश मुलाने आमच्या वर्गात कोणी नसतांना तसं लिहिलं. पण आमची अडचण अशी होती की आम्ही हे सिद्ध करू शकत नव्हतो. शेवटी सर्वानुमते असं ठरलं की सरांची माफी मागायची आणि पुन्हा असं होणार नाही याची ग्वाही द्यायची. संध्याकाळी शिखा, प्रीती, शुभांगी, रुचिता आणि मी, सरांच्या घरी जाऊन माफी मागितली, पुन्हा असं होणार नाही हे प्रॉमिस केलं. सरांनी सुद्धा मोठ्या मनानी आम्हाला माफ केलं आणि पुन्हा शिकवायला प्रारंभ केला.
                         हे असे अनेक प्रसंग, अनेक बदमाशा आमच्या बॅचने केल्यात की ते वर्णन करायला अक्ख पुस्तक अपुरं पडेल. आम्ही आज कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनिर, कोणी शिक्षक तर कोणी व्यावसायिक आहेत, पण सरांची शिस्त, त्यांच्याविषयीचा आदर, आणि आपलेपणा विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही तसाच आहे.
                      सर अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून शिकून मोठे झाले. एवढे मोठे होऊनही सर जमिनीशी संबंध विसरले नाहीत. असंख्य गरीब विदयार्थ्यांना त्यांनी सढळहस्ते मदत केली. कितीतरी वाट चुकलेल्या मुलांना योग्य दिशा देणारं मार्गदर्शन केलं. हे सगळं करतांना कुठेही मनात मोठेपणाचा लवलेश नाही. रा. स्व. संघाच्या शाखेत शिशु-बाल स्वयंसेवकांसोबत खेळणारे, सूर्यनमस्कार सुद्धा काढणारे नगर कार्यवाह(ते पण चाळिशीपार वय असतांना) म्हणून त्यांना मी जवळून बघितलं आहे.
                       आजारी आईवडिलांची सुश्रुषा करत, त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत सेवा करणारे खरवडे सर-सविता ताई म्हणजे श्रावण बाळंच. विद्यार्थ्यांनी मातृभक्ती, पितृभक्ती सदैव करावी हा त्यांचा आग्रह असायचा; आणि त्याचा वस्तुपाठ सरांनी स्वतः घालून दिला आहे.
                       मृदू स्वभावाचे सर गोड आवाजाचे धनी आहेतच. 'कट्यार काळजात घुसली' मधील नाट्यगीते जेवढ्या तालासुरात ते गातात तेवढ्याच तालासुरात 'गझल' सुद्धा गातात. मूळचा अध्यात्मिक पिंड असल्याने भजनं तन्मयतेने गाणं सुद्धा सहज जमतं सरांना. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमधील विनोदी, ललित, वैचारिक, सामाजिक, अध्यात्मिक आदि विविध साहित्यप्रकारांचे विपुल वाचन सरांनी केलं आहे.
                         मी हॉस्पिटल ला असतांना सरांनी केलेली धावपळ असो वा सढळहस्ते केलेली मदत असो की मी आयुष्याच्या वाटेवर चुकत असतांना माझी केलेली कानउघाडणी असो, माझ्या आयुष्यावर खरवडे सरांचे अनंत उपकार आहेत. मी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून समाजकार्य करतो म्हणून चिंता व्यक्त करणारे, हक्काने समजवणारे आणि माझ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या यशाबद्दल कौतुक करणारे 'खरवडे सर' म्हणजे ईश्वराने मला दिलेला 'बहुमूल्य वरदान' होय. सरांबद्दल विस्तृत लिहायचं तर मराठी साहित्यात नवीन ग्रंथांची भर पडेल एवढं काही आहे. त्यांचे ऋण कधीच फेडणे मला जमणार नाही की त्यांच्या एवढं होणं शक्य होणार नाही. पण त्यांच्या सद्गुणांमधील एक शतांश जरी घेऊन मी आयुष्य मार्गक्रमण करू शकलो तर मला आयुष्याचे सार्थक वाटेल.
                          उद्या दि. ३१ ऑगस्ट २०१६ रोजी खरवडे सर नोकरीतून सेवानिवृत्त होत आहेत. बऱ्याच व्यक्तींना सेवानिवृत्ती नंतर आयुष्यात पोकळी जाणवते पण सरांना ते होणार नाही नाही कारण 'त्वदियाय कार्याय बद्धा कटीयं' म्हणत सामजिक कार्यात अग्रेसर असण्याची त्यांची वृत्ती. सध्या ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चंद्रपूर विभागाचे मा. संघचालक म्हणून दायित्व निर्वाहन करत आहेतच. सेवानिवृत्तीनंतरही ते अधिक जोमाने राष्टरकार्य करत राहतील यात कोणाला शंकाच नाही. सरांच्या आयुष्यात खंबीरपणे सोबत करणाऱ्या त्यांच्या पत्नी आदरणीय सविताताईना यानिमित्ताने प्रणाम. सर तुम्हाला निरामय दीर्घायुष्य लाभो आणि आम्हाला आपलं अमूल्य मार्गदर्शन निरंतर भेटत राहो हीच देवाला प्रार्थना.
     सरांचे वर्णन करतांना मला राष्ट्रकवी स्व. मैथिलीशरण गुप्त यांच्या काही ओळी आठवल्या, ज्या सरांना चपखलपणे लागू पडतात. त्या ओळी सरांना अर्पण करून ही शब्दभेट पूर्ण करतो.
                             सब तीर्थों का एक तीर्थ यह
                               हृदय पवित्र बना ले हम!
                            आओ यहा अजातशत्रु बन
                             सबको मित्र बना ले हम!
                            रेखाए प्रस्तुत है अपने
                              मन के चित्र बना ले हम!
                          सौ सौ आदर्शों को लेकर
                             एक चरित्र बना ले हम.!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें