स्वातंत्र्य आहे आम्हास जगण्याचे, मनमुराद आनंद लुटण्याचे.!
अखंड वाहत्या नदीवर, सलग धावत्या हाय-वे वर, उधाणलेल्या समुद्रातटी 'सेल्फी' काढण्याचे स्वातंत्र्य.!
सुसाट वेगाने पळण्याचे स्वातंत्र्य.!
आपल्या प्रिय व्यक्तीला पाठीशी बसवून बाईक फिरवण्याचं स्वातंत्र्य.!
बाईकवर प्रिय व्यक्तीला बिलगून बसण्याचं स्वातंत्र्य.!
स्वातंत्र्य आहे आम्हास मनमोकळ्या गप्पा करण्याचं.!
कट्ट्यावर बसून वाफाळलेल्या चहासह 'फकाल्या' (गोष्टी) करण्याचं स्वातंत्र्य.!
सिगरेटचा धूर काढत वाढत्या प्रदुषणावर चिंता व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य.!
समोरासमोर नसतानाही इंटरनेट ने करायच्या 'चॅटिंग' चे स्वातंत्र्य.!
तिला पटवण्यासाठी वेगळे वेगळे स्टिकर वापरण्याचं 'हाईक' चे स्वातंत्र्य.!
दुरदेशीच्या नातवंडाला गोंजारण्यासाठी 'स्काईप' च स्वातंत्र्य.!
हवं ते शेअर करण्यासाठी सोशल मीडियाच स्वातंत्र्य.!
स्वातंत्र्य आहे आम्हास उनाड बागडण्याचं.!
दुकानांचे शटर बंद झाले की त्यावर तीन स्टंप काढून गल्ली क्रिकेट खेळण्याचं.!
मित्रांसमवेत नद्या-नाले पोहण्याचं स्वातंत्र्य.!
फुटबाल ते हॉकी आणि बॉक्सिंग पासून तर कबड्डीपर्यंत काहीही खेळण्याचं मुलींनासुद्धा स्वातंत्र्य.!
कंप्युटरच्या पत्ते, कार रेसिंग पासून मोबाईल च्या कँडी क्रश, पॉकेमोन गो पर्यंत खेळण्याचं स्वातंत्र्य.!
स्वातंत्र्य आहे आम्हास आवडत्या खेळाडूंना डोक्यावर घेण्याचं.!
सचिन ला देवत्व बहाल करण्याचं स्वातंत्र्य.!
क्रिकेटवेड्या देशात कबड्डी लीग ला गर्दी करण्याचं स्वातंत्र्य.!
ऑलिम्पिक स्पर्धकांवर टीका करून स्वतःची 'शोभा' करून घेण्याचं स्वातंत्र्य.!
आणि अशा टीकाकारांना चोख उत्तर देऊन आपल्या खेळाडूंची पाठराखण करण्याचं स्वातंत्र्य.!
स्वातंत्र्य आहे आम्हास फॅशन करण्याचं.!
चेहरा रंगवण्यापासून तर केस रंगावण्यापर्यंत आणि ओठ रंगवण्यापासून तर मेहंदीने हात रंगावण्यापर्यंत स्वातंत्र्य.!
चित्रविचित्र टॅटूनी शरीर गोदवण्याचं स्वातंत्र्य.!
पडदा आणि बुरखा नाकारण्याचं स्वातंत्र्य.!
धर्मनिरपेक्ष देशात बुरखा घालण्याचं स्वातंत्र्य.!
स्वातंत्र्य आहे आम्हास हवं ते बघण्याचं, हवं ते ऐकण्याचं.!
'सौभाग्यवती पती' पासून 'संत तुकाराम' मालिकांच्या माध्यमाने बघायचं टीव्हीचं स्वातंत्र्य.!
'फॅंटम' पासून ते 'रुस्तम' पर्यंत आणि 'एबीसीडी' पासून 'वायझेड' बघण्याचं सिनेमाचं स्वातंत्र्य.!
'बीबी की वाईन्स' ते 'गर्लीयापा' आणि 'स्ट्रगलर साला' पासून 'कास्टिंग कॉउच' पर्यंत वेब सिरीज बघण्याचं 'युट्यूब' चं स्वातंत्र्य.!
'मिर्ची' पासून 'सिटी' पर्यंत 'विविध भारती' ऐकण्याचं रेडिओचं स्वातंत्र्य.!
'माँ तुझे सलाम' ते 'मोह मोह के धागे' गुणगुणन्याचं संगीत स्वातंत्र्य.!
स्वातंत्र्य आहे आम्हास माहितीचं.!
जन्मापासून मृत्यूपर्यंत, पदत्यागापासून पदग्रहणापर्यंत बातम्या देण्याचं स्वातंत्र्य.!
निष्काळजी पणाने 'वाहून गेलेला पुल' प्रकर्षाने दाखवण्याचं स्वातंत्र्य.!
'सबसे तेज' दाखवताना 'राहून गेलेली भूल' लपवण्याचं स्वातंत्र्य.!
शासकीय कार्यालयातून माहितीच्या अधिकाराचं स्वातंत्र्य.!
स्वातंत्र्य आहे आम्हास चळवळींचे.!
अन्यायाविरोधात लढण्याचं स्वातंत्र्य.!
आरक्षणासाठी आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य.!
आरक्षणाविरोधात आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य.!
दलितांना अमानुष वागणुकीविरोधात आवाज बुलंद करण्याचं स्वातंत्र्य.!
महिलांवरील अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरण्याचं स्वातंत्र्य.!
स्वातंत्र्य आहे आम्हास लोकशाहीचं.!
हवा तो उमेदवार, हवा तो पक्ष निवडण्याचं स्वातंत्र्य.!
कोणीच नको असल्यास नोटा दाबण्याचं स्वातंत्र्य.!
सशस्त्र क्रांतीशिवाय फक्त मताधिकाराचा प्रयोग करून प्रस्थापित राजसत्ता बदलण्याचं स्वातंत्र्य.!
स्वतःच स्वतःची वेतनवाढ क्षणांतच मंजूर करण्याचं लोकनेत्यांचं स्वातंत्र्य.!
यावर टीका करण्याचं, विनोद करण्याचं लोकांचे स्वातंत्र्य.!
पंतप्रधानांना मुद्दे, तक्रारी, संकल्पना सुचवण्याचं स्वातंत्र्य.!
स्वातंत्र्य आहे आम्हास परदेशी जाण्याचं.!
भारतीय शिष्यवृत्तीवर विदेशात शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य.!
स्वदेशी उच्च शिक्षण घेऊन विदेशी नोकरी करण्याचं स्वातंत्र्य.!
देशाच्या सहिष्णुतेवर बोट ठेवून विदेशी निघून जाण्याच्या बाता करण्याचं स्वातंत्र्य.!
विदेशी गेल्यावर भारतातील अव्यवस्थेबद्दल खडे फोडण्याचं स्वातंत्र्य.!
विदेशात संकट उदभवल्याबरोबर मातृभूमीकडून मदतीची अपेक्षा करण्याचं स्वातंत्र्य.!
स्वातंत्र्य आहे आम्हास एखाद्या बालकाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा.!
निराधार झालेल्या वृद्ध माता-पित्यांना आधार देण्याचं स्वातंत्र्य.!
असहाय दिव्यांगांना सन्मानपूर्वक साहाय्य करण्याचं स्वातंत्र्य.!
'धारावीतील' झोपडपट्टीपासून 'मेळघाटातील' वनवासी पाड्यांवर निस्वार्थ सेवा करण्याचं स्वातंत्र्य.!
'दहशतग्रस्त' काश्मीरपासून ते 'नक्षलग्रस्त' गडचिरोलीपर्यंत जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याचं स्वातंत्र्य.!
रक्तदान, नेत्रदान ते अवयवदान करण्याचं स्वातंत्र्य.!
अत्यल्प उत्पन्नातील वाटा गरीब विद्यार्थ्यांना देण्याचं स्वातंत्र्य.!
हतप्रभ झालेल्या शेतकऱ्याला 'नाम' होऊन नवी उमेद देण्याचं स्वातंत्र्य.!
कोणातरी अनाथांचा नाथ होत हसू फुलवून जगाचं सौंदर्य वाढवण्याचं स्वातंत्र्य.!
स्वातंत्र्य आहे आम्हास सर्व ज्ञात- अज्ञात महापुरुषांना समरण्याचं.!
घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अनाम वीरांना वंदन करण्याचं स्वातंत्र्य.!
सामाजिक सुधारणांसाठी लढा देणाऱ्या समाजसुधारकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य.!
हजारो वर्षे परकीय आक्रमकांना पाणी पाजत 'भारत' जिवंत ठेवणाऱ्या नृसिंहांना दंडवत करण्याचं स्वातंत्र्य.!
वर्दीत राहून गर्दीचं संरक्षण करणाऱ्या सर्व जवानांना 'जय हिंद' करण्याचं स्वातंत्र्य.!
भारत परम वैभवाला नेण्याची ग्वाही देण्याचं स्वातंत्र्य.!
अशरण, अमरण तिरंगी ध्वजाला सलामी देण्याचं स्वातंत्र्य.!
भारताच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष करण्याचं स्वातंत्र्य.!
'भारत माता की जय' असे खड्या आवाजात जयघोष करण्याचं स्वातंत्र्य.!
स्वातंत्र्य आहे आम्हास तऱ्हे तऱ्हेच स्वातंत्र्य उपभोगण्याचं.!
आपण कोणत्या स्वातंत्र्याला उपभोगतो याचा सारासार विचार करण्याचं स्वातंत्र्य.!
स्वातंत्र्याच्या कोणत्या तऱ्हेने भारत विश्वविजयी होईल हे ठरवण्याचं स्वातंत्र्य.!
विवेकी विचाराने स्वातंत्र्य अंगीकारण्याचं स्वातंत्र्य.!
आणि स्वातंत्र्य आहे सर्व भारतीयांना आवाहन करण्याचं..
"हम मेहनत का दीप जलाकर
नया ऊजाला करना सीखें
देश हमे देता है सबकुछ
हम भी तो कुछ देना सीखें.!"
वंदे मातरम..!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें