रविवार, 19 नवंबर 2017

दशक्रिया केलेली बरी..!

                           दशक्रिया...! मुळातच पुनर्जन्म, अजर अमर आत्मा, मोक्ष अश्या संकल्पना श्रध्देने मानणाऱ्या हिंदु समाजातील मृत्यूनंतर करायच्या विधींपैकी एक विधी. तो करायचा कि नाही करायचा ? का बरं करायचा? कश्या पद्धतीने करायचा? कोणाच्या हातून करायचा? हे सर्व त्या त्या मृतकाच्या परिवाराचा वैयक्तिक प्रश्न असतो. त्यामुळे आमच्यासारख्या अल्पज्ञानी असणाऱ्या ज्ञानेश्वराने यावर आपल मत न मांडलेलंच बरं. 
                           पण सध्या या विधिच्याच नावावर मराठीत एक चित्रपट आज प्रदर्शित झालाय. बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारित  'दशक्रिया' हा चित्रपट फक्त प्रदर्शित नाही तर अतिशय वादविवादात आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यास कारण म्हणजे ब्राह्मण महासंघाने ह्या चित्रपटावर घेतलेले आक्षेप. ह्या चित्रपटाच्या ट्रेलरमधील दशक्रिया विधी करणाऱ्या पुरोहितांच्या वागणुकीविरोधात एका संवादावरून हा चित्रपट ब्राह्मण विरोधी आहे असा आरोप करत ब्राह्मण महासंघाने हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा निर्धार केलेला होता. 
                           मुळात पौरोहित्य करणे हा सुद्धा इतर व्यवसायांसारखा व्यवसाय आहे असं जर समस्त ब्राह्मण मंडळी मानत असतील. तर मग पुरोहितांना सर्व समाजाने व्यावसायिक समजून त्यांच्याशी वागायला हवं. जसं आपण न्हावी, शिंपी, माळी, सुतार, चांभार, लोहार आदि  व्यावसायिकांशी वागतो.
                          म्हणजे उदाहरणार्थ आपण माळ्याकडे फुलं हार घ्यायला जातो तर आपण त्याला मोबदला देऊन विकत घेतो,  त्याला आपण वाकून नमस्कार करणं किंवा "तुम्ही देवासाठी एवढं चांगलं फुल हार दिलेत म्हणून तुम्ही देव तुल्य आहात", असे मानून त्याला उच्च स्थान देत नाहीत. मात्र एखाद्या पुरोहिताला त्याने पूजा किंवा कोणते कर्मकांड करून दिलीत म्हणजे लागलीच आपला समाज त्याला वाकून नमस्कार करणं किंवा अतिशय उच्च समजल्या जाणारी वागणूक देतो. आणि कालांतराने असले पौरोहित्य करणारे स्वतःला श्रेष्ठ समजायला लागतात किंवा स्वतःची एकाधिकारशाही निर्माण करायला बघतात. ह्यात फक्त त्या पुरोहिताचीच चूक नसते तर त्याला तशी उच्च दर्जाची वागणूक देणाऱ्या समाजाची सुद्धा असते, जो नकळत अश्या वागणुकीतून एका भेदाभेदाला खतपाणी देत असतो. 
                         आणि ब्राह्मणेतर समाजात ह्याच भेदाभेदामुळे विरोध असेल तर त्यात चूक काय..? ह्या अश्या प्रकारच्या भेदाभेदाला उद्देशूनच "दशक्रिया" ह्या चित्रपटातील तो संवाद आहे, ब्राह्मण विरोध म्हणून नाही हे त्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर सहज लक्षात येते. "जसं मनोज जोशींनी साकारलेला किरवंत न्हाव्याला हि जाणीव करून देतो कि आमच्यामुळे तुला कमवायला भेटते." ही स्वतःच्या श्रेष्ठतेची आणि इतरांच्या स्वतःवर अवलंबित्व असण्याची हीन मानसिकतेचे दर्शन आहे. मुळात ब्रह्मज्ञान असलेल्या पुरोहिताला एवढंही भान नसावं कि ज्या ईश्वराच्या नावाने आपण हे सगळी कर्मकांड करून स्वतःची पोटं भरतो तोच ईश्वर हा सगळ्या सृष्टीचा पालनकर्ता आहे. मग स्वतःची एवढी आत्मप्रौढी कशाला मिरवायची.  
                        दशक्रिया विधीवर स्वतःची एकाधिकारशाही निर्माण केलेल्या एका किरवंतावर आणि त्याच्या आत्मप्रौढीवर जर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रहार होत असेल तर काय बिघडलं.?
                       कला, साहित्य, विज्ञान, नाट्य, संगीत, क्रीडा ह्या सर्व क्षेत्रांत इतर अन्य जातीतील लोकांपेक्षा आधी प्रगत होणाऱ्या, नव्या बदलांना सहजतेने सामोरं जाणाऱ्या, नव्या सुधारणांना सहजतेने स्वीकारणाऱ्या ब्राह्मण जातीतील लोकांनी ह्या असल्या एका संवादावरून मराठी भाषेतील एक राष्ट्रीय पुरस्कार विजेता असा चित्रपट बंद पाडायचा प्रयत्न करावा हे मुळातच न पटण्यासारखं.!
                       हिंदूंमधील अठरा पगड ब्राह्मणेतर जातींनी जर स्वतःवरील अन्यायाविरोधात आवाज उठवला ते हिंदुत्वाच्या बळकटीसाठी आवश्यकच आहे की, कारण एका परिवारात काही कमी जास्त झालं तर परिवारातच बोललं जातं. आणि ज्याच्यावर अन्याय होतो त्याची व्यथा ऐकून घेऊन तिचं निराकरण करणं हे त्या परिवाराच्या मजबुती आणि समृद्धीसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे.  तश्या अन्यायाला वाचा फोडणाऱऱ्या कलाकृतीला ब्राह्मण जातीतील लोकांनी विरोध करणे म्हणजे आपण हिंदूंमधील घटक नाहीत असा अन्वयार्थ काढायला वाट करून देणं होय.
                             हरिजन गिरिजनवासी बन के, नगर ग्राम सब साध चलें
उंच नीच का भाव घटा कर, समता के सद्‌भाव बढें
ऊपर दिखते भेद भले हों, जैसे वनमें में फूल खिले
रंग बिरंगी मुस्कानों से, जीवन रस पर एक मिले
संजीवनी रस अमृत पीकर, मृत्युंजय हम हिंदु है……………
संस्कृती सबकी एक चिरंतन खून रगों मे हिंदु हैं
विराट सागर समाज अपना हम सब इसके बिंदू हैं
                      हे गीत आम्ही बालपणापासून ऐकत आलोत . ह्याच्या अर्थानुसार समस्त जातीतील हिंदू हा एक आहे आणि त्याच्या आयुष्यातील दुःख कमी करून त्यास सुसह्य, सुखद आयुष्य जगण्यास मदत होईल अशी व्यवस्था निर्माण करणं हि काळाची गरज आहे. उपासना पद्धतीने हिंदू असणारेच नव्हे तर संपूर्ण विश्वात सुख शांती नांदावी असं हिंदूंच्या ग्रंथांमधील ऋचा, हिंदूंचे संत सांगत आले आहेत. अखिल विश्वाचं कल्याण मागणाऱ्या ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत कबीर, ह्या संतांनी सामान्य जणांच्या दुःखाला आपापल्या काळी वाचा फोडली होती, जातीभेदाच्या पल्याड जाऊन कार्य करणारे हे संत त्यांच्या सुख दुःखाशी समरस झालेले होते. असा तो सर्वसामान्य नर म्हणजेच नारायण आणि त्याच्या सुख दुःखाशी सोयरसुतक जर प्रगत लोकांना नसेल, जर त्याच्यावरील अन्यायाचं परिमार्जन करण्यास आपण तैयार नसू, त्या नररूपी नारायणाची सेवा करण्यास जर आपण तैयार नसू तर मात्र आपण आपल्या आचार विचारांचीच दशक्रिया केलेली बरी..!

2 टिप्‍पणियां: