मंगलवार, 16 अक्टूबर 2018

अनाथांची माई - सिंधुताई सपकाळ

अनाथांची माई - सिंधुताई सपकाळ

या देवी सर्वभूतेषु मातृ रूपेण संस्थितः
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः!
अर्थात- सर्व जीवांमध्ये मातृ रुपात स्थापित हे देवी नमस्कार असो.!
"विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील एक खेडेगावातील सत्यकथा आहे. २० वर्षाच्या एका तरुण स्त्रीला ती नऊ महिन्यांची गर्भवती असतांना तिच्यापेक्षा सुमारे २० वर्षे मोठ्या वयाच्या तिच्या पतीने गावातील काही नतद्रष्ट लोंकांच्या सांगण्यावरून घरातून हाकलून दिलं. हाकलून दिल्यानंतर गाईंच्या गोठ्यात तिची प्रसूती होते. प्रसूतीप्रसंगी तिच्या नवजात मुलीच्या संरक्षणासाठी उभी राहते गोठ्यातील एक गायच, जिचं शेण, मूत्र काढणे असं सगळं ती तरुणी दररोज करत असायची. त्यानंतर ती तरुणी आपल्या चिमुकलीला घेऊन आपल्या माहेरी आईकडे आली, मात्र तिच्या आईने सुद्धा तिला आसरा द्यायला नकार दिला. तिकडं गोठ्यातली गोमाता प्रसूतीसमयी दाई होते आणि इकडे माहेरातील स्वमाता मात्र परकी बाई होते."
समजा आपण असतो त्याठिकाणी तर? आपल्यातील एखाद्या स्त्रीवर असला प्रसंग गुदरला असता तर काय केले असते आपण.? निश्चितच आत्महत्या हा एक विचार मनात आला असता.? मग त्या स्त्रीने काय केलं असणार.? कहाणी अभी बाकी है मेरे दोस्त.
"त्या स्त्रीने मग निरुपाय होऊन रेल्वे स्थानकात भीक मागणे सुरू केलं. गोड गळ्याची ही तरुणी गाणी गाऊन रेल्वेच्या डब्यांमध्ये भीक मागायची आणि रात्र रेल्वे स्थानकात नाही तर स्मशानभूमीत. (स्मशानभूमीची कथा मोठी रंजक आहे नंतर कधी तरी) तिच्या मनात सुद्धा विचार आला की बस झालं हे लाचारीचं निराधार जिणं. आता जीव दिल्याशिवाय गत्यंतर नाही. असंच एके रात्री रेल्वे स्थानकावर प्रचंड उद्विग्नावस्थेत तिने आत्महत्या करायचा निंर्णय घेतला. मात्र त्यावेळी तिला मरणासन्न अवस्थेतील एक भिकारी दिसला जो त्यावेळी भुकेला होता आणि आपल्याजवळील भाकर त्या मरणासन्न भिकाऱ्याला खाऊ घालत असताना त्या तरुणीच्या मनात काही विचार चमकले (कदाचित नियतीचा संदेश असेल). आपण मरण पत्करायला जात असताना ह्या मरणासन्न व्यक्तीला भाकर खाऊ घातली आणि ह्याच्या जीवात जीव आला म्हणजे आपण मरायचं नाही. आता परिस्थितीशी फक्त लढायचं."
त्यानंतर भीक मागत जगतांना तिला अनेक अनाथ मुले दिसली तिने त्या सगळ्यांना आपल्या मायेच्या कवेत घेतली आणि तिथून सुरू झाली "सिंधुताई सपकाळ" ह्या तरुणीची "माई" बनण्याकडे वाटचाल.
होय ती तरुणी म्हणजेच सिंधुताई सपकाळ ज्यांनी हजारो अनाथ मुलांना आपल्या पदराखाली घेतलं त्यांना मातृसुख दिलं, त्यांना चांगलं नागरिक घडवण्यासाठी जीवापाड श्रम केलेत, अक्षरशः ह्या अनाथ मुलांसाठी भीक मागितली, मात्र त्यांना उपाशी झोपू दिलं नाही त्यांना शिक्षणापासून वंचित होऊ दिलं नाही.


नकुशी म्हणून जन्मलेल्या सिंधुताईंना बालपणापासून नशिबी हेटाळणी आली, त्यांच्या शिक्षणाला अटकाव घालण्यात आला तोही चक्क त्यांच्या जन्मदात्या आईकडूनच. मात्र त्याच सिंधुताईंनी परिस्थिती ह्या गुरूकडून एकलव्याप्रमाणे स्वयंअध्ययन करत ज्ञान प्राप्त केले, ते ज्ञान जे हजारो पुस्तकं वाचून सुद्धा कदाचित मिळणार नाही. आणि त्याच ज्ञानाच्या आधारे गावोगावी इतकंच काय तर अमेरिकेत सुद्धा व्याख्यानं देत त्या फिरतात आपल्या हजारो पुत्रांसाठी मदत मागतात. समाजाला देतात. आज त्यांची वर्धा, पुणे, अमरावती ह्या जिल्ह्यांमध्ये अनाथाश्रमे आहेत (जी इतकी वर्षे झालीत विना शासकीय अनुदानाची चालवल्या जातात). शेकडो जावई, सुना, नातवंडे, पणतू असणाऱ्या सिंधुताई ह्या सर्वांच्या तीर्थरूप झाल्यात.
त्यांना भर तारुण्यात सोडून बाहेर हाकलणारा त्यांचा नवरा स्वतःच्या म्हातारपणी निराधार म्हणून जेव्हा सिंधुताईंकडे आश्रयास आला. तेव्हा त्यांनी त्यांना सुद्धा आपला पुत्र म्हणूनच आपल्या हजारोंच्या परिवारात सामावून घेतलं (पती म्हणून नव्हे). क्षमाशीलता हा गुण मातृत्वाचा निदर्शक आहे, आणि म्हणूनच पुरुषाने कितीही चुका केल्यात तरी स्त्रिया त्यांच्या चुका पदरात घालतात. सिंधुताई म्हणजे ह्या मातृत्वाच्या मूर्तिमंत प्रतीक.
आपण सांभाळ करत असलेल्या अनाथ मुलांच्या प्रेमात आपल्याकडून कधी दुजाभाव होऊ नये. स्वतःच्या रक्ताच्या मुलीचं संगोपन करतांना इतरांच्या संगोपनात काही उणीव, काही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी आपली मुलगी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाला दिली. ह्यासारखं दुसरं निरलस, निरपेक्ष मातृत्वाचं उदाहरण दुसरं असू शकत नाही. साक्षात आपल्या पित्याच्या आनंदासाठी स्वतःचं राजपद, स्त्रीसुख ह्यावर कायमचं पाणी सोडत प्रतिज्ञाबद्ध होणारा भीष्म पितामह ह्याचीच आठवण येते. दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाला पारखे होणारी अशी व्यक्ती दुर्मिळच.
आज नवरात्रीचा सातवा दिवस. उद्या आठव्या दिवशी मातृरुप असणाऱ्या नवकन्यांचं पूजन करण्यात येईल. नऊवारी पातळ परिधान करून डोक्यावरील पदर कायम वागवत सदैव समाजसेवेच्या कार्यात रत, लौकिकार्थाने अडाणी, अशिक्षित सिंधुताईंची व्याख्याने, त्यांची विचार ऐकलेत म्हणजे निश्चितच स्त्री सक्षमीकरणाची व्याख्या सुस्पष्ट होते. आधुनिकतेच्या नावाखाली अनिर्बंध स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या आणि नंतर कोल्हेकुई करणाऱ्या आमच्या पिढीच्या मुलामुलींना (#मी_बी आणि #तो_मी_नव्हेच असं हॅशटॅग चालवणारी आमची पिढी), ज्यांना नैराश्य फार लवकर हतप्रभ करून टाकते अश्या आमच्यासारख्या तरुणांना सिंधुताईचं जीवन म्हणजे सकारात्मकतेची संजीवनीच. नावाप्रमाणेच सिंधू अर्थात सागराप्रमाणे विशाल अंतःकरणाने हजारो अनाथांची माई होणाऱ्या सिंधुताई सपकाळ ह्यांना आज नवरात्रीच्या सातव्या रात्री साष्टांग दंडवत.!

भवानी की अंबा, तू साक्षात मातृरुप सावली,
हजारो अनाथांची एक माई सिंधुताई जाहली..!
अनंत अडचणींच्या डोंगर- दऱ्यांतून चालली..
जगण्याच्या उमेदीची नवी प्रभातकिरणे फाकली..
हजारो अनाथांची एक माई सिंधुताई जाहली..!
- ज्ञानेश