दयारूपी नर्मदेचे मूर्तिमंत रूप- राणी अहिल्यादेवी होळकर
“या देवी सर्वभूतेषु दया रूपेण संस्थितः
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
!”
अर्थात :- सर्व जीवांमध्ये दयेच्या रुपात स्थापित देवी तुला नमस्कार असो.!
अर्थात :- सर्व जीवांमध्ये दयेच्या रुपात स्थापित देवी तुला नमस्कार असो.!
काही महिन्यांपूर्वी माझ्या कार्यालयातील सहकारी मित्राच्या लग्नाच्या निमित्ताने उज्जैन ला जाण्याचा योग आला. दोन दिवसांच्या दौऱ्यात बऱ्यापैकी उज्जैन दर्शन आणि महत्वाचे म्हणजे दोन महापुरुष महाकाल आणि कालभैरव ह्यांची भेट घेऊन झाली त्यांच्या मंदिरांमध्ये.! त्यांना राम राम् करत असतांना मनात आधीच साठलेली एक तीव्र इच्छा जागृत झाली की इथून इंदोर ला नक्की जाऊया उद्या; आणि ही इच्छा जागृत होण्याचं कारण म्हणजे लोकमाऊली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.
ज्यावेळी मी इंदोरला गेलो होळकरांचे महाल बघितले, इंदोर शहर थोडेसे का होईना बघितलं तेव्हा एकच प्रश्न सतावत होता की आपल्या जन्मगावापासून ४५०-५०० किमी अंतरावर येऊन मराठा साम्राज्य मजबूत करणाऱ्या स्त्रीच्या कार्याची उंची किती प्रचंड असेल. ज्यावेळी आपण ह्या उंचीचे मोजमाप करायला जातो (माझी पात्रता नसतांना सुद्धा) तेव्हा अहिल्यादेवींच्या जीवनाचे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडत जातात आणि त्यावेळी त्यांच्या अथांग कार्यकर्तृत्वाची खोली आणि व्याप्ती जाणवत जाते!
आपल्या पतीसोबत अनेकदा प्रत्यक्ष लढाईला जाणाऱ्या या महान स्त्रीने त्याकाळी आपल्या सासरे श्री. मल्हारराव होळकर यांच्या सांगण्यावरून एक क्रांतिकारी गोष्ट केली ज्याचे मधुर फळ नंतर अवघ्या माळवा प्रांतातीलच नव्हे तर हिंदुस्थानातील अनेक भागातील लोकांना चाखायला मिळाले. अहिल्यादेविंचे पती श्री. खंडेराव होळकर यांच्या मृत्यपश्चात त्यांनी सती जाऊ नये अशी भूमिका त्यांचे सासरे मल्हारराव ह्यांनी घेतली जी त्याकाळी एक विलक्षण आणि अभूतपूर्व अशी घटना होती. अहिल्यादेवी यांनी सुद्धा आपल्या सासऱ्यांच्या ह्या क्रांतिकारक निर्णयाला उत्तरोत्तर सार्थ ठरवत एक जनहितकारक व्यवस्था उभारली.
त्यांचं शौर्य, त्यांचं क्षात्रतेज निर्विवादच होते मात्र इतिहासाने त्यांची ओळख प्रामुख्याने ज्या गोष्टीसाठी घेतली ती म्हणजे त्यांनी केलेले लोककल्याणकारी कार्ये, त्यांचा दानशूरपणा. त्यांनी त्याकाळी घाट बांधणे, मंदिर उभारणे, मंदिरांचा जीर्णोद्धार ह्या कार्यांपासून तर वाटसरूणा पाणी पिण्यासाठी पाणपोई उभारणे, सदावर्त उभारणे, वृक्षलागवड करणे ह्यांसारखी अनेक लोककल्याणाचे उपक्रम केलेत. उत्तर-दक्षिण तीर्थयात्रेला जाणाऱ्या तिर्थयात्रींसाठी मार्ग बांधून देण्यासोबतच हिंदूंच्या अनेक मोठ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं पुण्य कार्य त्यांनी केलं. हे सगळं करतांना त्यांनी आपला करोडो रुपयांचा वैयक्तिक खजिना रिता केला. एरवी असं बघायला मिळतं की खजिन्यातून राजघराण्यातील लोकांची वैयक्तिक उपभोग, लालसा ह्यांची पूर्ती करायला राज्याचा खजिना रिता केला जातो मात्र इथं उलटंच होतं. मुळातच अंतरीचा प्रखर दयाभाव त्यांच्या हातून ह्या सगळ्या कल्याणकारी कार्ये घडवून आणत असेल, तो महादेवच जाणो.
रोज जनतेच्या समस्या स्वतः लक्षपूर्वक ऐकून त्यावर योग्य उपाययोजना करण्यात प्रसिद्ध अहिल्यादेवी यांच्या उदारतेचा एक प्रसंग वाचण्यात आला होता. "एकदा बुंदेलखंडात मुक्कामी असतांना त्यांना अतिशय सुंदर, चांगल्या प्रतीच्या कापडांची भेट अहिल्यादेवी यांना आली. तर त्यांनी ती भेट आपल्या समवेत असणाऱ्या सेविकेला देऊन टाकली."
"संपति
सब रघुबर के आहि के" ह्या वचनाला जागून लोककल्याणाचे अनेक कार्ये तडीस नेत नर्मदेच्या तटाला एक आगळे महत्व प्राप्त करून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे साक्षात दयेची वाहती सरिताच.!
आज नवरात्रीच्या दुसऱ्या रात्री त्यांना शतकोटी
नमन..!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें