हिंदवी स्वराज्याची चैतन्यदात्री- माँ जिजाऊ साहेब
“या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः!”
अर्थात:- सृष्टीतील चैतन्य स्वरूप असणाऱ्या देवी तुला नमस्कार.!
चैतन्य कसं असतं.? कसं जागवलं जातं.?
हे प्रश्न पडले तर समजावं की ह्या लेखाच्या सुरुवातीलाच आपल्यात चैतन्याची चेतना जागृत झालीय..! मुळात चैतन्य म्हणजे एक जिवंतपणा, जो फक्त शरीरातील मांसपेशी जिवंत आहेत म्हणूनच नाही तर आत्मिक सचेतन अवस्था प्राप्त होऊन सर्व व्यक्तिमत्वाला जिवंतपणा प्राप्त होणं.! उदाहरणार्थ मरगळ झटकून उत्साही होणं, ताजेतवाने होणं म्हणजे चैतन्यमय होणं म्हणू शकतो.
आता हा नियम ज्या अर्थी सजीव मनुष्याला लागू आहे तर ओघाने ह्या संपूर्ण सृष्टीला आणि ह्या सृष्टीतील सगळ्या सजीव, निर्जीव घटकांना लागू होत असेल. म्हणजे जर एखाद्या घराला अवकळा आलेली असेल तर त्यालाही मेहनतीने नवं स्वरूप प्रदान करून चैतन्याची जागृती करता येतं. राजा शालिवाहनाने म्हणे मातीच्या सैनिकांमध्ये प्राण फुंकून त्यांच्या सैन्याच्या माध्यमातून परकीय शत्रूला परास्त केलं होतं. म्हणजे मातीतही चैतन्य सळसळणे शक्य आहे. मग असंच चैतन्य एका मरगळलेल्या, भग्नता प्राप्त झालेल्या शहराला प्राप्त करून देणे शक्यच, नव्हे ते मानवी जीवनाच्या विकासासाठी अत्यावश्यकच.!
अश्याच एका मरगळलेल्या शहराला नवसंजीवनी देण्याचं महत्कार्य एके काळी एका महान मातेने केले होते. आई भवानीची भक्त असणारी ही महान माता म्हणजे साक्षात जितीजागती भवानीच जणू.! त्या शहराचं नाव म्हणजे पुणे आणि पुण्याला परत चैतन्यमय करणाऱ्या ती महान माता म्हणजे सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडेमंडित महाराणी माँ जिजाऊ साहेब.! छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या आई, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या आजी! होय ज्या मातेने आपला पुत्र देश, धर्म ह्यांच्या रक्षणासाठी अवघ्या रयतेला अर्पण केला तीच महान माता.!
पुण्यावरून ज्यावेळी परकीय आक्रमक आदिलशहाच्या
आशीर्वादाने गाढवाचा नांगर फिरवला गेला होता त्यानंतर पुणे शहरावर एक मरगळ आली होती. ह्या शहराचं चैतन्य हरवलं होतं. ह्या चैतन्याची पुनर्स्थापना खुद्द जिजाऊंनी केलं शिवबांच्या हाताने सोन्याचं नांगर फिरवून.!
त्याकाळी ह्या अश्या अनेक क्रांतिकारक मात्र सकारात्मक कृती करून जिजाऊंनी रयतेत चैतन्याचे वारे भरले. मुळात छत्रपती शिवाजी राजांच्या हिंदवी स्वराज्यामागील प्रेरणा आणि मार्गदर्शन जिजाऊंचेच.! आई भवानीच्या कृपादृष्टी सोबत जिजाऊंच्या दुरदृष्टीची साथ होतीच की महाराजांना.!फक्त आपल्या पोटच्या मुलाचीच नव्हे तर अवघ्या रयतेची आई झालेल्या जिजाऊंनी स्वतःच्या आपुलकीच्या व वडीलकीच्या वागणुकीमुळे अवघ्या मावळ्यांना स्वराज्यासाठी लढण्यास उत्साह दिला, मातृभूमीसाठी स्वतःला अर्पण करण्याची उर्मी प्रदान केली.!
“आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं, जडली येडी प्रीत.!
”
स्वतः शूरवीर असणाऱ्या आईचा पुत्र असणाऱ्या महाराजांना गर्भस्थ असतांनाच संस्कार झालेत त्यामुळेच पुढलं स्वराज्य स्थापनेचे कार्य त्यांनी अथक परिश्रमाने पार पाडलं आणि त्याचा अभिषेक हजारो मावळ्यांनी स्वतःच्या रक्ताने केला.
फक्त एक शहरच नाही तर अवघ्या महाराष्ट्र भूमीला सळसळते चैतन्य प्रदान करण्याचं महत्कार्य करणाऱ्या माँ जिजाऊंना आज नवरात्रीच्या पहिल्या रात्री शतकोटी वंदन.!
जय भवानी!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें