सोमवार, 15 अक्टूबर 2018

समाजऋण फेडणारी आधुनिक लक्ष्मी- सौ. सुधा मूर्ती


समाजऋण फेडणारी आधुनिक लक्ष्मी- सौ. सुधा मूर्ती
तत्कालीन राष्ट्रपती डाँ कलाम  हस्ते  सन्मान स्वीकारताना सौ सुधा मूर्ती !
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः!
अर्थात- लक्ष्मी रुपात सर्व जीवांमध्ये स्थापित देवी तुला नमस्कार असो.!
पैसा आडका, संपत्ती, सुबत्ता समृद्धी हे साधारणतः लक्ष्मीची प्रत्यक्ष भौतिक जीवनातील रूपे मानतात. त्यामुळे प्रचंड संपत्ती असणाऱ्यांना लक्ष्मीपुत्र संबोधण्याची पद्धती आपल्या देशात आहे. श्रीमंती आणि लक्ष्मी ह्यांच थेट नातं आहे असं आपण मानतो. कधीकाळी सरस्वती पुत्र हे लक्ष्मीपुत्र होत नव्हते किंबहुना सरस्वती पुत्रांवर दारिद्र्याची छाया सदैव असायची (एखाद दुकटं उदाहरण वगळता) हल्लीच्या काळी तर ज्याच्यावर सरस्वतीचा वरदहस्त त्याच्यावर लक्ष्मीची कृपा असेही चित्र हमखास बघायला मिळतं. बदलत्या काळाने अनेक स्थित्यंतरे अनुभवलीत त्यातील एक म्हणजे सरस्वती प्रसन्न असणाऱ्यांनी (म्हणजे बुद्धिमान, ज्ञानी) आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या प्रचंड ज्ञानाच्या उपयोगाने संपत्ती निर्माण केलेली आहे.
असंच एक उदाहरण म्हणजे भारतातील आईटी (माहिती तंत्रज्ञान ) क्षेत्र किंवा त्यातही प्रामुख्याने सॉफ्टवेअर क्षेत्र. ह्या क्षेत्राचे भारतातील जनक अशी ओळख ज्यांची आहे अशे श्री. एन नारायण मूर्ती ह्यांनी आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत इन्फोसिस ह्या कंपनीची स्थापना केली आणि त्यानंतर भारतात झालेल्या आर्थिक उदारीकरणा बरोबर नवश्रीमंतांची संख्या वाढली.
"नारायण मूर्ती हे तेव्हा पाटणी कॉम्पुटर मध्ये नोकरीला होते. आणि त्यांच्या सुविद्य पत्नी टाटा कंपनीत कार्यरत होत्या. एके दिवशी संध्याकाळी नारायण मूर्ती हे घरी आले आणि म्हणाले, "येणाऱ्या काळाची पावलं मी ओळखतो आहे. जग झपाट्याने बदलतंय. मी ठरवलं आहे की आपल्या काही सहकाऱ्यांसोबत नवीन कंपनी सुरू करायची. पण त्यासाठी माझ्याकडे पुरेसे भांडवल नाही. तू काही मदत करू शकतेस.?" त्या सुविद्य पत्नीने त्वरित आपल्या कपाटातील साठवलेली रक्कम त्यांना सुपूर्द केली. त्यांच्या पत्नीने स्वतःच्या दैनंदिन खर्चातून शिल्लक राहिलेली रक्कम त्या कपाटात जमा करणं सुरू केलं होतं आणि स्वयंबचतीतून जमा झालेल्या त्या १०,०००/- एवढ्या रकमेतून सुरू झालेला व्यवसाय आज करोडो अब्जावधीचा झालाय. त्यामुळे निश्चितच नारायण मूर्तींच्या पत्नीला लक्ष्मीच म्हटलं पाहिजे!
ज्यांच्यामुळे सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य इन्फोसिस कंपनी उभी राहिली आणि नंतर ह्या कंपणीमुळे लाखो लोकांना अर्थसमृद्धी प्राप्त झाली. नारायण मूर्तींच्या ह्या लक्ष्मीरूपी सुविद्य पत्नीचं नाव "सुधा मूर्ती".
ज्यावेळी त्यांनी टाटा सोडून पतीच्या नवीन उद्योगात सहभाग घेतला. त्यावेळी जे. आर. डी. टाटांनी त्यांना सांगितलं होतं, "आपण संपत्तीचे मालक नसतो तर फक्त विश्वस्त असतो. संपत्ती हस्तांतरित होत असते. ती आपण सांभाळून समाजाच्या भल्यासाठी खर्च करायची. समाजासाठी आपलं देणं लागतं ते ह्या संपत्तीच्या माध्यमातून समाजाला परतफेड करायची"
मुळातच संवेदनशील पालकांचं संस्कारी संगोपन लाभलेल्या सुधा मूर्ती यांनी टाटांच्या ह्या शिकवणीला अनुसरून इन्फोसिस फौंडेशन ची स्थापना केली. त्याच्या अध्यक्ष ह्या नात्याने त्या इन्फोसिस फौंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यात सक्रिय असतात. दुर्गम भागांमध्ये पुस्तकं पुरवणं, वाचनालये चालवणं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास आर्थिक सहाय्य करणं, अशी नानाविध उपक्रम चालवणाऱ्या सुधा मूर्ती हळव्या, संवेदनशील मनाच्या लेखिका सुद्धा आहेत.
विविध भागांत भ्रमण करतांना आलेले, शिक्षकी पेशातील, समाजसेवतील विविध प्रसंग वेचक, निवडकपणे त्यांनी आपल्या पुस्तकांमधून वाचकांसमोर मांडलेले आहेत. "डॉलर बहू", "पितृऋण", "बकुळा", "पुण्यभूमी भारत" "वाईज अँड अदरवाईज", "थैलीभर गोष्टी", "अस्तित्व", "आजीच्या पोतडीतील गोष्टी", "सुकेशिनी", "गोष्टी माणसांच्या", "थैलीभर गोष्टी" आदि त्यांची पुस्तके कुठेही कंटाळवाणे वाटू देता सहज उपदेश करणारी आहेत. सुधा मूर्ती म्हणजे सरस्वतीचा वरदहस्त असलेल्या व्यक्तिमत्व.

संपत्ती कमावली पाहिजे आणि तिचा विनियोग समाजासाठीच केला पाहिजे ह्या ठाम मताने मार्गक्रमण करणाऱ्या, त्या पद्धतीने कुठलाही बडेजाव मिरवता साधं जीवन व्यतीत करणाऱ्या मूर्ती दाम्पत्याविषयी लिहावं तेवढं कमीच.
सरस्वतीची असीम कृपा असणाऱ्या सुधा मुर्तीं ह्यांनी स्वतःच्या बचतीच्या रकमेतून एका अब्जावधी रकमेच्या उद्योगाचा पाया रोवला. कृतीने त्या साक्षात लक्ष्मी आहेत जिने समृद्धी, संपत्ती ह्यांच्या निर्माणाला सहाय्य केलं. अश्या ह्या सहृदयी, सढळ, संवेदनशील, समाजसेवी अश्या आधुनिक लक्ष्मी सुधा मूर्ती ह्यांच्याप्रति आज सहाव्या दिवशी शब्दसंपत्तीची उधळण.!







3 टिप्‍पणियां:

  1. कुठलाही गाजावाजा न करता समाजकार्य करणाऱ्या सुसंस्कृत आणि आदर्श असं हे दुर्मिळ व्यक्तीमत्व....
    चांगला उपक्रम.... छान लिहीतो आहेस.
    चालू असू दे.

    जवाब देंहटाएं
  2. सामान्य ते असामान्यत्व गाजवणारे व्यक्तिमत्व....
    सुंदर लिखाण....

    जवाब देंहटाएं