आधुनिक विद्यादायिनी - सावित्रीमाई फुले
नमो देवी महाविद्ये नमामि चरणौ तव ।
सदा ज्ञानप्रकाशं में देहि सर्वार्थदे शिवे ।।
अर्थात- हे विद्येची अधिष्ठात्री महादेवी तुझ्या चरणाला नमस्कार. सगळीकडे ज्ञानाचा प्रकाश पसरू दे.!
साधारणतः १८४८ चा काळ असेल तेव्हा आपण पारतंत्र्यात होतो, देशावर विदेशी ब्रिटीशांचं शासन होतं. त्यांनी केलेली लूट, त्यांनी आमच्यावर केलेलं अनन्वित अत्याचार आपण सर्व जाणतोच. मात्र त्याहीपेक्षा भयंकर पारतंत्र्य आम्हाला वर्षानुवर्षे होते. आमच्या जनतेच्या पायांमध्ये पडलेल्या बेडयांपेक्षाही मजबूत अश्या शृंखला आमच्या समाजाच्या आचार- विचारांवर होत्या. आणि शृंखलाबद्ध समाज त्या सामाजिक बंधनांच्या, जातिभेदांच्या, वाईट चालीरीती, अनिष्ट रुढीपरंपरांचे अमानवीय साखळदंड तोडून टाकण्याच्या दिशेने पावलं टाकत होता. विविध समाजसुधारक देशाच्या विभिन्न भागांत समाजाला अंधकारातून बाहेर काढण्यास कार्यरत होते.
अश्याच एका अमानवीय रुढीच्या बंदीतुन त्याकाळी स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल महाराष्ट्रात टाकल्या गेले. "ती अनिष्ट रूढी होती- स्त्री शिक्षणाला बंदी";
त्यातून स्वातंत्र्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्या गेले १८४८ साली जेव्हा पुण्यात मुलींसाठी शाळा उघडल्या गेली. आणि हे पुण्यकार्य केलेत एका नवतरुण असलेल्या दाम्पत्याने त्यांचं नाव महात्मा ज्योतिराव फुले व त्यांच्या अर्धांगिनी सावित्रीमाई फुले.!
सावित्रीमाई ह्या शाळेच्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्यात. मुळात विद्या म्हणजेच एखादी जीवनोपयोगी कला. आपल्या शास्त्रांमध्ये विद्येच्या ६४ कला सांगितल्या जातात. आणि ह्या कुठल्याही विद्येत पारंगत व्हायचं असल्यास त्याच अधिकृत शिक्षण घ्यावं लागतं. म्हणजेच विद्येचा थेट संबंध शिक्षणाशी असतो आणि तेच शिक्षण घ्यायला जर स्त्रियांना बंदी असेल तर मग एक मनुष्य म्हणून त्यांच्या जीवनाचं काय.? त्यांच्या नशिबी तर कायम अंधकार दाटलेला, कारण अज्ञान हे मनुष्य जीवनातील सगळ्यात मोठं अंधकार आणि अज्ञान असण्याचं मुख्य कारण अविद्या अर्थात शिक्षण न घेणे.
"जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी"
मग अश्या जगाचा उद्धार करणाऱ्या स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवणं म्हणजे कधीही परिमार्जन न करता येऊ शकणारी पापच. पापक्षालन करायला कुठलाही मार्ग नसणारे हे पाप. ह्यावर त्याकाळी क्रांतिकारक पाऊल उचलले ज्योतिरावांनी. त्यांनी आधी आपल्या पत्नीला शिक्षण दिलं आणि मग स्वतःच्या पत्नीला शिक्षिका म्हणून अध्यापन कार्य करण्यास प्रोत्साहन दिलं.
मग अश्या जगाचा उद्धार करणाऱ्या स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवणं म्हणजे कधीही परिमार्जन न करता येऊ शकणारी पापच. पापक्षालन करायला कुठलाही मार्ग नसणारे हे पाप. ह्यावर त्याकाळी क्रांतिकारक पाऊल उचलले ज्योतिरावांनी. त्यांनी आधी आपल्या पत्नीला शिक्षण दिलं आणि मग स्वतःच्या पत्नीला शिक्षिका म्हणून अध्यापन कार्य करण्यास प्रोत्साहन दिलं.
त्याकाळी समाजातील तथाकथित उच्च, सवर्ण म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तींनी ह्या कार्याला प्रचंड विरोध केला. तरीही सवित्रीमाईंनी दगड, धोंडे, शेण ह्यांचा चिखल अंगावर झेलत निर्भीडपणे आपलं पवित्र कार्य सुरू ठेवलं. जणू एक यज्ञच जो अविरत सुरू ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा होम केला. त्यांनी ह्याव्यतिरिक्त अनेक सेवाकार्य केलीत. प्रामुख्याने प्लेगच्या साथीत आपला दत्तक पुत्र डाँ. यशवंतराव ह्यांच्या साथीने रुग्णांची अविरत सेवासुश्रुषा केली ज्यात दुर्दैवाने त्यांचाही मृत्यू झाला.
"काव्य फुले" सारखा काव्यसंग्रह रचणाऱ्या सावित्रीमाई खऱ्या अर्थाने आधुनिक सावित्री होत्या. त्या सावित्रीने म्हणे आपल्या पती सत्यवानासाठी साक्षात यमदेवतेलाच आपल्या तपोबलाने झुकायला लावलं होत. ह्या आधुनिक सावित्रीने सुद्धा आपल्या पतीच्या समजकार्याला खांद्याला खांदा लावत साथ दिली आणि अमानवीय व्यवहार करणाऱ्या तथाकथित सवर्ण समाजाला झुकायला लावलं. मात्र हे सगळं करतांना त्यांना ज्यांचा त्रास झाला त्यांच्याविषयी किंचितही कटुभाव मनात न ठेवता त्यांनी सगळ्या समाजाला शिक्षण देण्याचं कार्य केले. त्यांनी विधवांच्या व बलात्कार पीडितांच्या प्रसूतीसाठी उभारलेल्या केंद्रातच अनेक उच्चवर्णीय महिलांच्या प्रसूती झाल्यात. त्यातीलच एक ब्राह्मण विधवेचा मुलगा म्हणजेच डाँ यशवंतराव ज्याला त्यांनी दत्तक घेतले होते.
सावित्रीमाई आपले उपकार अनंत आहेत. आपण त्याकाळी त्रास घेतला, हालअपेष्टा सहन केल्यात म्हणून आज आमच्या मुली, आमच्या आई बहिणी शिकत आहेत. नव्हे आकाशात मोकळा श्वास घेत आहेत, अवकाशाला गवसणी घालत आहेत. हे श्रेय निश्चितच आपलं व ज्योतिराव फुले यांचे.
अश्या
या आधुनिक विद्यादायिनी सावित्रीमाई फुले यांना आज नवरात्रीच्या तिसऱ्या रात्री साष्टांग दंडवत.!
कुसुमापरी कोमल तरी वज्राहुनी कठीण मी..
फेकलेल्या विटांचे उत्तर द्याया झाले दगड मी..
अन्यायाचा परिमार्जन केले करुनी विद्यार्जन मी..
करोडो स्त्रियांची प्रतिनिधी एक स्त्री सावित्री मी..!
- ज्ञानेश
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें